दैव बलवत्तर म्हणून तरुणी बचावली; पाण्यावरून घसरून प्लॅटफॉर्म व पटरीच्या मध्ये अडकली | पुढारी

दैव बलवत्तर म्हणून तरुणी बचावली; पाण्यावरून घसरून प्लॅटफॉर्म व पटरीच्या मध्ये अडकली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईला निघालेली तरूणी प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्येच पडली. मात्र, सुदैवाने येथे असलेल्या पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तिचे प्राण वाचले. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर शुक्रवारी (दि.24) सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईला निघालेली एक तरूणी रेल्वेत चढताना प्लॅटफॉर्मवर सांडलेल्या पाण्यावरून घसरली, अन थेट रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्येच पटरीवर अडकून पडली. स्वाती हळदणकर असे या तरूणीचे नाव आहे.

बंगळुरु -मुंबई उद्यान एक्सप्रेसमध्ये मुंबईला जाण्यासाठी ही तरूणी रेल्वेत चढत होती. प्लॅटफॉर्म आणि रेल्वे गाडी यामध्ये खूपच कमी अंतर असते. अशा अरूंद जागेत ती तरूणी गाडी पुढे जाईपर्यंत जीव मुठीत घेऊन राहिली. गाडीचा वेग तसा कमी होता. मात्र, ती येथे पडल्यावर घाबरल्यामुळे हालचाल करण्याच्या तयारीत असतानाच पोलिस कर्मचारी अमोल सूर्यवंशी यांचे तिच्याकडे लक्ष गेले.

त्यांनी धावत जाऊन तिला अजिबात न हलण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे ती जागेवरून हलली नाही. त्यामुळे तिचे प्राण वाचले. पण रेल्वे गाडी अंगाला घासून गेल्यामुळे खूप जखमा झाल्या. गाडी निघून गेल्यावर येथे असलेल्या पोलिस कर्मचारी आणि आरपीएफ जवानाने तिला बाहेर काढले. अशा प्रकारे वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे तिचे प्राण वाचले.

सरकत्या जिन्यावरून आजी पडल्या
रेल्वे स्थानकावर असलेल्या सरकत्या जिन्यावरून घसरून पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. एक आजी या सरकत्या जिन्यावरून जात असताना पडल्या. नागरिकांनी त्यांना उचलून बाजूला ठेवले. मात्र, या आजी बराच वेळ येथेच पडून होत्या. त्यांना बराच वेळ येथे रुग्णवाहिका मिळाली नाही, असे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी सांगितले.

पुणे रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार केंद्र आहे. मात्र, आपत्कालिन घटना घडली तर रुग्णांना घेऊन जाण्यासाठी एकही रुणवाहिका नाही. येथे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास वेळेला एक तरी रुग्णवाहिका सज्ज असायला हवी. रेल्वे प्रशासनाने तत्काळ येथे एक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी.
                                                       – हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

Back to top button