घरफाळाप्रकरणी कुणाला पाठीशी घालत असाल तर सोडणार नाही : खा. धनंजय महाडिक | पुढारी

घरफाळाप्रकरणी कुणाला पाठीशी घालत असाल तर सोडणार नाही : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील बर्‍याच गडबडी ऐकायला मिळत आहेत. कामात हयगय केल्यास, गैरकारभार समोर आल्यास मुंबईत बैठक लावेन. पुरावे देऊनही कारवाई होत नाही, असे चालणार नाही. जाणीवपूर्वक डोळेझाक करणार्‍या अधिकार्‍यांना घरी जायला लावेन. घरफाळाप्रकरणी जाणीवपूर्वक कुणाला पाठीशी घालत असाल तर मी सोडणार नाही. सरकार बदलले आहे, हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम खा. धनंजय महाडिक यांनी महापालिका अधिकार्‍यांना दिला. घरफाळा घोटाळ्यातील चौकशी अहवाल जाहीर करण्याची सूचनाही यावेळी अनेकांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

खा. धनंजय महाडिक यांनी महापालिकेत विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. सत्यजित कदम व माजी महापौर सुनील कदम यांनी 35 हजार मिळकतींना शून्य घरफाळा असल्याचे सांगितले. घरफाळा घोटाळ्यातील दोन अहवाल आले आहेत. त्यातील खरा कोणता आणि खोटा कोणता, हे महापालिकेने जनतेसमोर जाहीर करावे. घरफाळा घोटाळाप्रकरणी सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांना एकत्र घेऊन संयुक्त बैठक घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रा. जयंत पाटील यांनी, घरफाळा लावून घेण्यासाठी पेटी ठेवल्यास गैरकारभाराला आळा बसेल असे सांगितले.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी 3 कोटी 18 लाख आणि 1 कोटी 55 लाख असे दोन अहवाल असल्याने एवढी तफावत कशी? याचा अहवाल देण्यास सांगितले आहे. चौकशीला विलंब लावल्याबद्दल अधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत. जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यावेळी माजी नगरसेवक किरण नकाते, विलास वास्कर, अजित ठाणेकर, राजसिंह शेळके, रूपाराणी निकम यांच्यासह अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.

Back to top button