पुणे : महिलांना ‘सखी कक्षा’चा आधार; जिल्हा परिषदेकडून स्त्रियांसाठी स्वतंत्र कक्ष

पुणे : महिलांना ‘सखी कक्षा’चा आधार; जिल्हा परिषदेकडून स्त्रियांसाठी स्वतंत्र कक्ष
Published on
Updated on

नरेंद्र साठे
पुणे : 'शासकीय कार्यालयात काम करताना अनेकदा आम्हा महिलांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या काळात तर मोठ्या अडचणी निर्माण होतात. परंतु, जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेला 'सखी कक्ष' या काळात आमच्यासाठी आता दिलासादायक ठरत आहे. दोनशे महिला कर्मचारी आहेत. कार्यालयीन वेळेत मासिक पाळी सुरू झाली तर गैरसोय व्हायची. 'सखी कक्षा'ने ही गैरसोय दूर झाली, असे अभियंता वर्षा भिडे सांगत होत्या.

पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. मात्र, निसर्गतः महिला शारीरिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा भिन्न आहेत. त्यांना मासिक पाळीच्या कालावधीतही काम करावे लागते. या काळात आठ तास सलग शारीरिक अथवा मानसिक श्रमाचे काम करणे महिलांसाठी खूप अवघड असते. मासिक पाळीच्या काळात महिलांना आराम करता यावा, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन अनोखे पाऊल टाकून सखी कक्ष सुरू केला. राज्यात पहिल्यांदाच शासकीय कार्यालयात असा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

सखी कक्ष सुरू होऊन आता दीड वर्ष झाले आहे. त्याबद्दल बोलताना भिडे म्हणाल्या की, मासिक पाळीच्या काळात अनेकींना पोटदुखीचा त्रास होतो. अशावेळी आराम करण्याची गरज असते. सखी कक्षामुळे महिला कर्मचार्‍यांसह अभ्यागतांसाठीही सोयीचे झाले आहे. जिल्हा परिषेदत कामानिमित्त येणार्‍या महिला अभ्यागतांपैकी काही महिला छोट्या बाळांना घेऊन येतात, बाळांना स्तनपान करण्यासाठी या कक्षाचा उपयोग होत आहे.

कनिष्ठ प्रशासन अधिकारी शीतल कोठावदे म्हणाल्या, 'मासिक पाळीच्या दिवसांत, त्याचबरोबर गर्भवती महिलांना देखील आराम करण्यासाठी या कक्षाचा चांगला उपयोग होत आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात अनेकदा कार्यालयात येताना महिला भिजतात. अशावेळी
भिजलेले कपडे बदलण्यासाठी कक्षाचा उपयोग होतो.'

कामाचा ताण आल्याने काही महिला कर्मचार्‍यांना ताण येतो, अस्वस्थ वाटू लागते. अशा प्रसंगी आम्हाला याच कक्षात जाऊन काहीसा आराम करता येतो. आम्हा सर्वच महिला कर्मचार्‍यांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने चांगला निर्णय घेऊन सखी कक्ष सुरू केला. अशा प्रकारचा महिलांसाठी सखी कक्ष सर्व कार्यालयांत असणे अत्यंत गरजेचे आहे.
– सुषमा दबडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, बांधकाम दक्षिण, जि. प.

मुक्त संवादाचा झाला फायदा…
जिल्हा परिषदेने महिलांसाठी मुक्त संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सखी कक्षाची मागणी याच मुक्त संवाद कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेतील महिला कर्मचार्‍यांनी केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकार्‍यांना सखी कक्ष सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या.

असा आहे सखी कक्ष…
जिल्हा परिषद, पंचायत समिती आवारात असलेली एक खोली, कक्षाशेजारी शौचालय. बेड, सोफा, टेबल, खुर्ची, फॅन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरसा, गरम पाण्यासाठी हीटर, सॅनिटरी नॅपकिन, इन्सीनरेटर, प्रथमोपचार पेटी (औषधांसह) उपलब्ध आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news