

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारपासून (दि. 26) प्रारंभ होत असल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारात उपवासाच्या जिन्नसांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. बाजारात आवक वाढली असताना मागणीही वाढल्याने शेंगदाणा, भगर, राजगिरा व शिंगाड्याचा दर स्थिर आहे. तर, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने साबूदाण्याच्या भावात क्विंटलमागे पाचशे ते एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर तसेच पुढील नऊ दिवस उपवास करणार्यांची संख्या मोठी आहे. या काळात साबूदाणा, भगर, राजगिर्यासह शेंगदाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी राहते. त्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशाच्या विविध भागांतून या मालाची आवक होते. सध्या बाजारात तमिळनाडू राज्यातील सेलम जिल्ह्यातून साबूदाण्याची आवक होत आहे. मागील काही दिवसांमध्ये साबुदाण्याच्या दरवाढीमुळे केलेली साठवणूक त्यात पुढील महिन्यापासून साबूदाण्याचा नवीन हंगाम सुरू होत असल्याने बाजारातील आवक वाढली आहे. सध्या बाजारात 150 ते 160 टन साबूदाण्याची आवक होत आहे.
बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने आठवडाभरात साबूदाण्याच्या भावात क्विंटलमागे 500 ते 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सद्यःस्थितीत बाजारात कर्नाटक, आंध्र प्रदेश व गुजरात येथून दररोज 150 ते 200 टन शेंगदाण्याची आवक होत आहे. तर यंदा भगर, राजगिरा व शिंगाड्याचे उत्पादन चांगले आहे. नवरात्रीच्या उपवासाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील आवकही चांगली असून त्याला मागणीही आहे. बाजारात नाशिक जिल्ह्यातून दररोज 200 टन भगर, 10 ते 15 टन राजगिरा दाखल होत आहे. आवक- जावक चांगली असल्याने या जिन्नसांचे दर टिकून असल्याचे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.
नवरात्रीमुळे भगर, राजगिरा व साबूदाण्याला चांगली मागणी आहे. वाढत्या महागाईच्या काळात यंदा पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. आठवडाभरात साबूदाण्याच्या भावात क्विंटलमागे 500 रुपयांनी घसरण झाली आहे, तर अन्य जिन्नसांचे दर स्थिर आहेत.
– आशिष दुगड, साबूदाणा व भगर व्यापारी
असे आहेत दर
(प्रतिकिलो रुपयांत)
जिन्नस घाऊक दर किरकोळ दर
भगर 106 ते 115 रुपये 118 रुपये
साबूदाणा 65 ते 74 रुपये 84 रुपये
शेंगदाणा 100 ते 125 रुपये 128 रुपये
राजगिरा 100 ते 108 रुपये
पिठांचे दर असे
(प्रतिकिलो रुपयांत)
प्रकार घाऊक दर किरकोळ दर
राजगिरा 130 ते 150 रुपये 120 रुपये
शिंगाडा 180 ते 200 रुपये
साबूदाणा 70 ते 80 रुपये 96 रुपये
भगर 90 ते 140 रुपये 122 रुपये