कोल्हापूर : देवीचे सुवर्ण अलंकार, पालखीला झळाळी | पुढारी

कोल्हापूर : देवीचे सुवर्ण अलंकार, पालखीला झळाळी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी अंबाबाईच्या वापरातील सुवर्ण अलंकार, सोन्याची पालखी यासह नित्य पूजेतील विविध वस्तूंना नवी झळाळी प्राप्त झाली आहे. शुक्रवारी मंदिरात देवीचे दागिने व पालखीची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नवरात्रौत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने याची जय्यत अंतिम टप्प्यात आली आहे. जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरात छत्रपती चॅरिटबेल देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी मंदिरातील मुख्य गाभारागृहाची स्वच्छता करण्यात आली. यानंतर गुरुवारी चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता मोहीम झाली. शुक्रवारी देवीचे सोन्याचे दागिने व पालखीची स्वच्छता करण्यात आली. देवीच्या मूर्तीला परिधान केल्या जाणार्‍या दागिन्यांसह तिच्या खजिन्यातल्या खास दागिन्यांना यामुळे झळाळी प्राप्त झाली. यात शिवकालीन कवड्याची माळ, 16 पदरी चंद्रहार, बोरमाळ, पुतळ्याची माळ, ठुशी, कुंडल, सोन्याचा किरीट, कर्णफुले, मासोळी, चाफेकळी हार, कोल्हापुरी साज, मंगळसूत्र, 116 पुतळ्याची माळ, लप्पा, सात पदरी कंठी यांचा समावेश आहे. याशिवाय सोन्याची पालखी, देवीची आयुधे व म्हाळुंग यांचीही स्वच्छता करण्यात आली.

तुळजाभवानी मंदिरातील तयारी

जुना राजवाड्यातही नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आंबा देवघर, नगारखाना, जुना राजवाडा परिसराची स्वच्छता छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आली. जुना राजवाड्यातील दरबार हॉल, देव्हाराघर, भवानी मंडप, नगारखाना यासह विविध वास्तूंची स्वच्छता मोहीम यावेळी राबविण्यात आली.

सरकारी कार्यालयांकडून दुर्लक्ष

जुना राजवाड्यात असणार्‍या विविध सरकारी कार्यालयांकडून नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करण्यात आले. पागा बिल्डिंगमधील सरकारी कार्यालयात प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. छत्रपती ट्रस्टच्या जागेतील कार्यालयाचा मोफत वापर सरकारी कार्यालयाकडून केला जातो. मात्र त्याची निगा, स्वच्छता, देखभाल, दुरुस्ती केली जात नसल्याबद्दलच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. इमारतीच्या दर्शनी बाजूवर झाडेझुडपे वाढली असून त्यांचा इमारतींना धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणीही नागरिकांतून होत आहे.

Back to top button