Navratri 2022 : नवरात्रीतील दि. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीतील महत्त्वाचे मुहूर्त | पुढारी

Navratri 2022 : नवरात्रीतील दि. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीतील महत्त्वाचे मुहूर्त

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : या वर्षी दिनांक 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ (Navratri 2022) होत आहे. सोमवारी ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे ५ पासून दुपारी १.४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी आज दिली.

Navratri 2022 : दसरा 5 ऑक्टोबर

दिनांक 30 ला ललिता पंचमी असून दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे, असे सांगून श्री. दाते म्हणाले दिनांक 3 रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा असून दिनांक 4 ऑक्टोबर रोजी मंगळवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे आणि दसरा 5 रोजी बुधवारी आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी येतात मात्र या वेळेस दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत 9 दिवस किंवा 10 दिवसांचा कालावधी असतो. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो. या वर्षी घटस्थापनेपासून ९ व्या दिवशी नवरात्रोत्थापना असून दसरा १० व्या दिवशी आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा

अशौचामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्यांना 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर (अशौच संपल्यावर) 28 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर किंवा 3 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 4 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे, असेही श्री दाते यांनी सांगितले. महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी 3 ऑक्टोबर रोजी आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 5 ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.२६ ते ३.३१ या दरम्यान आहे.
– मोहन दाते, पंचांगकर्ते

नवरात्रातील महत्वाचे दिवस 

26 सप्टेंबर – घटस्थापना
30 सप्टेंबर – ललिता पंचमी
2 ऑक्टोबर – महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)
3 ऑक्टोबर – दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास
4 ऑक्टोबर – नवरात्रोत्थापना
5 ऑक्टोबर – विजया दशमी (दसरा)

हेही वाचलंत का?

 

Back to top button