

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मी दौरा करत असताना वातावरण एवढे गरम का झालेय असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केला. राष्ट्रवादीत घराणेशाही असून काका-पुतण्यांचे राजकारण सुरु आहे. त्यातून भ्रष्टाचार जन्म घेतो आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत राष्ट्रवादीला शंभर गुण मिळतील, अशी टीका त्यांनी केली. घराणेशाही, भ्रष्टाचाराविरोधात बारामतीत भरपूर काम करण्यासारखे आहे. त्यासाठी कोणाच्या दबावाला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी असून अशा दबावाला भ्यायचे कारण नाही, असेही त्या म्हणाल्या.
बारामतीतील भाजपपक्ष कार्यालयाला भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.आमदार राहुल कुल, आमदार राम शिंदे, भीमराव तापकीर,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, योगेश टिळेकर, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, गणेश भेगडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, आदी उपस्थित होते. मंत्री सीतारामन यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. त्यांचे किती मंत्री, सदस्य जेलमध्ये गेले याचा त्यांनी विचार करावा. भाजपचे चरित्र्य असे नाही. ज्या बारामती मतदारसंघाच्या विकासाचा बोलबोला आहे, तेथे प्रत्यक्षात काही भाग सोडता अन्य ठिकाणी विकासाची वानवा आहे.
येथे एकाच कुटुंबावर छप्परफाड सोने पडते आहे. तालुक्यातील अनेक गावांना अद्याप पाणी नाही. समतोल विकास झालेला नाही. एकाच भागात सगळ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. भाजपचे आमदार, लोकप्रतिनिधी असलेला भाग जाणिवपूर्वक विकासापासून वंचित ठेवला गेला आहे. भाजपचा पदाधिकारी, कार्यकर्ता असेल तर त्याला टार्गेट केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यांची अशी कार्यशैली नाही. देशातील ११४ अविकसित जिल्ह्यांसंबंधी सध्या ते काम करत आहेत. त्यातील अनेक जिल्हे भाजप शासित नाहीत. परंतु विकासात राजकारण न आणता समतोल विकास साधण्यासाठी दरमहा पंतप्रधान तेथील जिल्हाधिकाऱयांशी बोलत आहेत.
देशाच्या विकासासाठी गाव, जिल्हा ते राज्याचा विकास व्हायला हवा. मग इथे भाजपला का टार्गेट केले जात आहे, असा सवाल करून त्या म्हणाल्या, ज्या पक्षाच्या नावात राष्ट्रवाद आहे त्यांच्याकडून हे अपेक्षित नाही. त्यांचा पक्ष नॅशनॅलिस्ट नसून डायनास्टीक असल्याचे त्या म्हणाल्या. दिल्लीपासूनच हवा फिरली असून त्याचा प्रत्यय लवकरच येईल असा इशारा त्यांनी दिला.
भाजप हा घराणेशाहीच्या विरोधात आहे. पक्षातील अनेकांनी महत्त्वाची पदे भूषवली. त्यात सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक आहेत. देशात काॅंग्रेसने घराणेशाहीचे राजकारण केले. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. आमचा लढा घराणेशाहीविरोधात आहे. जे पक्ष घराणेशाही चालवतात ते स्वतःच्याच घरातील लोकांना पुढे करतात. अमेठी, रायबरेलीत गेल्या ५० वर्षात झाला नव्हता एवढा समतोल विकास सध्या सुरु आहे. हे विकासाचे सूत्र लक्षात घेवून आम्ही काम करत आहोत.
केंद्राच्या योजना भाजप कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत न्याव्यात. गरीबांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. केंद्राचा ५० कलमी कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. काॅंग्रेसने ५० वर्षे गरीबा हटावचा नारा दिला. प्रत्यक्षात त्यांनी गरीबांनाच हटवले. बारामतीत भ्रष्टाचार व घराणेशाहीविरोधात भरपूर काम करण्यासारखे आहे. ईव्हीएम आल्यापासून सगळे ठिकठाक असले तरी बुथप्रमुखांनी बोगस मतदार शोधून काढावेत. निवडणूक प्रक्रियेत लक्ष घालावे. माझ्याकडे बारामतीसह तेलंगणातील अन्य एका मतदारसंघाची जबाबदारी आहे. परंतु पक्ष जेव्हा जेव्हा सांगेन तेव्हा बारामतीला येणार. येथील प्रत्येकाशी वैयक्तिक नाते निर्माण करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
..हे मिडियाने नोटीस करावे
माझ्या दौऱ्याची चर्चा सुरु आहे. येथील लोकांना माझी भाषा समजेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मी उपस्थितांना विचारू इच्छिते की माझी भाषा तुम्हाला समजतेय का, असा प्रश्न सीतारामन यांनी उपस्थित केला. उपस्थितांनी हात उंचावून समजतेय असे सांगितल्यावर मिडियाने हे नोटीस करावे. माझी भाषा समजत नसती तर दौऱ्याला प्रतिसाद मिळाला असता का, लोक मला ऐकण्यासाठी थांबले असते का असा सवाल त्यांनी केला.