मोहम्मद पैगंबर अवमानप्रकरणी नाविका कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा | पुढारी

मोहम्मद पैगंबर अवमानप्रकरणी नाविका कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मोहम्मद पैगंबर अवमानाचा आरोप झालेल्या पत्रकार नाविका कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांच्यावरील सर्व गुन्हे दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. नाविका यांच्याविरोधात पुढील आठ आठवड्यात कोणीही कारवाई करु नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यास नाविका कुमार स्वतंत्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याआधी भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांच्यावरील सर्व आरोप दिल्लीत वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसाच दिलासा नाविका कुमार यांना देण्यात आला आहे.

नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल ज्या दूरचित्रवाहिनी कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केले होते. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाविका कुमार करीत होत्या. या प्रकरणात नुपूर शर्मा यांच्यासह नाविका यांच्यावरही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. याआधी ८ ऑगस्ट रोजी न्यायालयाने नाविका कुमार यांना अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button