सांगली : इस्लामपुरात विवाहितेचा बुडून मृत्यू | पुढारी

सांगली : इस्लामपुरात विवाहितेचा बुडून मृत्यू

इस्लामपूर;  पुढारी वृत्तसेवा :  येथील राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत (वय 29, रा. कोळी मळा परिसर) या विवाहितेचा कापूसखेड हद्दीतील विहिरीत बुडून संशयास्पद मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी पहाटे घडला. या मृत्यूची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. पती कौस्तुभ सरनोबत याने इस्लामपूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली. दरम्यान, मुलीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी माहेरकडील नातेवाईक दिवसभर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी पहाटे राजनंदिनी या पती कौस्तुभ यांच्या सोबत मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. ते दोघे कापूसखेड रस्ता ते हनुमाननगर रस्त्याने निघाले होते. राजनंदिनी या थोड्या बाजूला गेल्या. त्यावेळी तेथे असणार्‍या विहिरीत त्या पाय घसरून पडल्या. त्यामध्ये त्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, असे कौस्तुभ यांनी वर्दीत म्हटले आहे. कौस्तुभ व त्यांच्या घरच्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पालिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यापासून 40 ते 45 फूट लांब असलेल्या विहिरीत राजनंदिनी यांचा मृतदेह पाण्यात तरंगत होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

दरम्यान, राजनंदिनी यांच्या मृत्यूची चौकशी करावी, यासाठी राजनंदिनी यांच्या माहेरकडील नातेवाईक पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. पोलिसांनी कौस्तुभ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडे चौकशी सुरू होती. येथील उपजिल्हा रुग्णालयात राजनंदिनी यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बहे बेटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  राजनंदिनी यांचे माहेर कोल्हापूर येथील बावडा आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आहेत.

Back to top button