पुणे : सावधान! ‘सोव्हा’ व्हायरस आला; केव्हाही खाली होऊ शकते बँक खाते | पुढारी

पुणे : सावधान! ‘सोव्हा’ व्हायरस आला; केव्हाही खाली होऊ शकते बँक खाते

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार वाढत असतानाच आता सोव्हा अ‍ॅड्राइड ट्रोझन व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे मोबाईल बँकिंग सिस्टीमला धोका पोहचून काही क्षणांत खाते रिकामे होण्याची शक्यता सायबर तज्ज्ञांनी वर्तवली आहे.  पुण्यात असे प्रकार अद्याप दिसून आले नसले तरी देशात या व्हायरसने शिरकाव केला असून, वेळीच त्यापासून सावध राहण्याचे अवाहन सायबर तज्ञांनी केले आहे.

हा व्हायरस ब्लॅक मार्केट आणि इंटरनेटच्या डार्क  वर्ल्डवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या नव्या व्हायरसमुळे कोणत्याही मोबाइल बँकिंग प्रणालीचा युजरनेम आणि पासवर्ड हॅक केला जाऊ शकतो. तो एकदा मोबाइलमध्ये इन्स्टॉल झाला तर डिलीट करता येऊ शकत नाही. मारिच राक्षसाप्रमाणे त्याला रूप बदलता येते. मोबाईलमधील अन्य अ‍ॅपचे रूपही हा व्हायरस धारण करू शकतो. भारतीय मोबाइल बँकिंग प्रणालीवरील या संभाव्य धोक्याबाबत इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (आयसीईआरटी) एनआयए आणि
गृह मंत्रालयाला धोक्याचा इशारा दिला आहे.

सोव्हा अ‍ॅड्राइड ट्रोझन व्हायरस हा दोन पद्धतींनी मोबाइलमध्ये शिरतो.
फिशिंग एसएमएसद्वारे अ‍ॅप अपडेट करण्यासाठी सांगून मेसेज क्लिक करण्यास सांगून तो मोबाईलमध्ये शिरतो. त्यामुळे अनोळखी मेसेजच्या लिंकवर क्लिक न करणे हा त्यावरील एक उपाय ठरू शकतो. त्याचबरोबर तुमचे अ‍ॅप प्ले स्टोअरद्वारे अपडेट करा. सोव्हा अँड्रॉइड ट्रोझन व्हायरस इतर  कुठल्याही मोबाइलमध्ये बनावट अँड्रॉइड अ‍ॅपद्वारेही पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे मोबाईलमध्ये अ‍ॅन्टीव्हायरचा उपयोग करा. तसेच सदैव सतर्क राहा.
                                                    – रोहन न्यायाधीश, सायबर तज्ज्ञ.

मोबाइल बँकिंगला धोका

  • नागरिकांनी सतर्कता बाळगावी
  • सायबर तज्ज्ञांचे अवाहन

पासवर्डही बदलावा
अनेक जण दीर्घकाळ पासवर्ड बदलत नाहीत. भारतात तर हा अनुभव बहुतांशी आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल बँकिंग अ‍ॅपचा पिन एकदा सेट केला की तो कुणी बदलतच नाही. धोका त्यामुळे अधिक आहे.

असे काम करतो व्हायरस
फोनचे की-स्ट्रोक्स, कुकीजमध्ये शिरतो.
कॅमेर्‍याद्वारे स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ-ऑडिओ
तयार करून कमांड सेंटरला पाठवतो.
स्क्रीन लॉक, स्वाईप, पॅटर्न लॉक किंवा
पिन लॉकची माहिती लांबवतो आणि पुरवतो.
मोबाईल बँकिंगचे यूझर नेम आणि पासवर्ड लांबवितो.

Back to top button