नाशिक : ‘जलजीवन’ प्रभावीपणे राबण्याचे दादा भुसे यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना | पुढारी

नाशिक : ‘जलजीवन’ प्रभावीपणे राबण्याचे दादा भुसे यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
गावागावांतील प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, त्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या पाणी पुरवठा आढावा बैठकीत दिले.

शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. बैठकीला ‘मजीप्रा’चे कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे, ग्रामीण पाणी पुरवठा उप विभागाचे कार्यकारी अभियंता पी. सी. भांडेकर, उपअभियंता अरविंद महाजन, शाखा अभियंता के. आर. दाभाडे, ए. एन. पगार उपस्थित होते. दहिवाळसह 25 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरील गावांमध्ये नवीन पंप बसविणे, नवीन पाइप टाकणे, टाक्या बसविणे, नळ कनेक्शन देणे आदी कामे करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच काही गावांना 10 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होतो, तो दररोज किंवा दिवसाआड करावा. याशिवाय, गावागावांतील किरकोळ समस्याही तत्काळ निकाली काढण्याची सूचना ना. भुसे यांनी अधिकार्‍यांना केली. जल मिशन योजनेत सर्व गावांचा समावेश करावा. गावाच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना संबंधित गावांना विश्वासात घ्यावे. जिथे नवीन वस्ती झाली असेल, तेथील पिण्याच्या पाण्याबरोबर इतर मूलभूत सुविधा देण्याचे निर्देशित करण्यात आले. कार्यकारी अभियंता नरवाडे व भांडेकर यांनी गावांसाठी केलेल्या जलव्यवस्थापनाची माहिती दिली.

हेही वाचा:

Back to top button