पुणे : खंडणीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : खंडणीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अवैध सावकारीतून तारण म्हणून ठेवलेली मालमत्ता सोडविण्यासाठी जागा खरेदी-विक्री करणार्‍या एका व्यावसायिकाकडे 33 लाख रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणार्‍या दोघा सावकारांवर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई केली आहे. सुरुवातीला सावकारांनी दहा लाख रुपयांचे प्रतिमहिना पाच टक्के व्याजाने कर्ज देऊन तारण म्हणून व्यावसायिकाची मर्सिडीज गाडी ठेवून घेतली होती.

त्यानंतर व्याजावर व्याजाची आकारणी करून आणखी काही मालमत्ता ताब्यात घेतली होती. उमेश श्रीहरी मांगडे (वय 37, रा. श्रेया कॉम्प्लेक्स, मांगडेवाडी, कात्रज) आणि नवनाथ ज्ञानोबा मासाळ (वय 40, रा. माऊली निवास, पिसोळी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. उमेश हा मांगडेवाडी येथील असून, त्याचा हॉटेल व बांधकामाचा व्यवसाय आहे. तर त्याचे वडील मांगडेवाडीचे माजी सरपंच आहेत. तसेच मासाळ हा पिसोळी गावचा माजी सरपंच असून, त्याचा पाण्याचा व्यवसाय आहे.

याबाबत उरुळी देवाची येथील एका 34 वर्षांच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी 2020 पासून सुरू होता. फिर्यादी यांचा जागा खरेदीचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायासाठी 10 लाख रुपयांची गरज होती. त्यांनी नवनाथ मासाळ यांच्याकडे पैसे मागितले. तो त्याच्या ओळखीचा सावकार उमेश मांगडे याच्याकडे त्यांना घेऊन गेला. त्याने फिर्यादीस 5 टक्के प्रतिमहिना व्याजदराने सुरुवातीला 10 लाख रुपये देण्याचे मान्य केले.

पैसे देताना त्याचे व्याज कपात करून 9 लाख 50 हजार रुपये फिर्यादींच्या हातात दिले. त्यासाठी त्यांची मर्सिडीज बेन्झ गाडी गहाण ठेवून घेतली. त्यांनी 4 लाख 10 हजार रुपये व्याजाचे परत केले. त्यानंतर त्यांना काही महिने व्याज परत न केल्याने व्याजावर व्याजाची आकारणी करून त्यापोटी दोघांनी फिर्यादीकडून 1 फ्लॅट व 1 शॉपचा समजुतीचा करारनामा करून घेतला. तो रद्द करण्यासाठी आणखी 33 लाख रुपयांची मागणी करू लागला.

Back to top button