तळेगाव परिसरात झेंडू जोमात | पुढारी

तळेगाव परिसरात झेंडू जोमात

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव परिसरात भात,ऊसाचे पीक घेतले जात असलेतरी अनेक शेतकरी झेंडू, या फुलझाडांचीही लागवड करुन उत्पादन घेतात. दसरा-दिवाळी सणाचे वेळी या फुलांना मागणी असल्यामुळे यावेळी फुले तोडणीस यावी या हेतूने झेंडूची लागवड जुलै महिन्यात करण्यात येत असते. सध्या झेंडूची फुलझाडे पाऊस पाणी भरपूर असल्यामुळे जोमात बहरत आहेत. या फुलझाडांची लागवड साधारण जुलै महिन्यामध्ये करण्यात येते लागवड झाल्यानंतर साधारण १५ दिवसांनी खुरपणी करावी लागते.

महिनाभरात युरीया आदी खत टाकावे लागते या फुलझाडांस पाऊस नसेल तर दर आठवड्यास पाणी द्यावे लागते. हे पीक दोन ते तीन महिन्यांनी दसरा दिवाळीच्या वेळी बहारात येते या सणासुदीच्या वेळी झेंडूस मागणी असते. दर एकरी या फुलांचे साधारण ३टन उत्पादन निघते. खर्च वजा जाता व्यवस्थित भाव मिळालातर एकरी साधारण एक ते दीड लाख रुपये उत्पन्न निघते असे प्रगतशील शेतकरी रोहीत रजपुत यांनी सांगितले. ज्यांना जमिनीचे कमी क्षेत्र आहे असे शेतकरी झेंडू आदी फुलझाडांची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न असे दिसून येते.

Back to top button