नाशिक : फसवणूक टाळण्यासाठी द्राक्षविक्रीवेळी सावध रहा | पुढारी

नाशिक : फसवणूक टाळण्यासाठी द्राक्षविक्रीवेळी सावध रहा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
द्राक्षपीक हे वार्षिक आणि खूप खर्चिक आहे. परराज्यातील व्यापार्‍यांना द्राक्षविक्री करताना व्यापारीवर्गाकडून शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. ती टाळण्यासाठी पोलिसांनी शेतकर्‍यांसाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन केल्यास त्यांचे नुकसान टळेल. त्यामुळे द्राक्षविक्री करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

नाशिकच्या द्राक्ष विज्ञान मंडळाच्या वतीने द्राक्ष उत्पादक चर्चासत्र व गौरव सोहळा शेवंता लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायदार संघाचे नाशिक विभाग अध्यक्ष रवींद्र निमसे, वासुदेव काठे, मनोज जाधव, एन. डी. पाटील, गुंड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सचिन पाटील म्हणाले की, व्यापारीवर्गाकडून शेतकर्‍यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. नाशिक पोलिसांतर्फे अवगत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा द्राक्ष उत्पादकांनी अवलंब केल्यास या फसवणुकीला आळा बसेल. यावेळी पाटील यांनी व्यापार्‍यांकडून फसवणूक झालेल्या द्राक्ष बागायदारांच्या तक्रारी अर्जांचा स्वीकार केला.
प्रमुख अतिथी अखिल भारतीय भाजीपाला संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे म्हणाले की, युवा शेतकर्‍यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभारून आपला शेतमाल आपणच मार्केटिंग करणे ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाराष्ट्र द्राक्ष बागायदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले म्हणाले की, द्राक्ष उत्पादकांनी उत्पादन खर्चात बचत केली पाहिजे. चर्चासत्रात डॉ. जी. एस. प्रकाश म्हणाले की, रूट स्टॉक द्राक्ष आपल्याला मिळालेले वरदान असून, त्याचे योग्य संगोपन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ द्राक्ष उत्पादकांना द्राक्षजीवन गौरव पुरस्कार, युवा द्राक्ष उत्पादकांना द्राक्षरत्न गौरव पुरस्कार, द्राक्ष सल्लागार यांना द्राक्षमित्र पुरस्कार व द्राक्ष उत्पादकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले. योगेश कृषी सेवाचे संचालक मयूर जाधव , कु माधुरी ढिकले, कु. अदिती संदीप मोगल आदींचे सत्कार करण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button