पुणे : तर विद्यार्थ्यांसमोर अडचणी; वैद्यकीय महाविद्यालय समस्यांच्या गर्तेत | पुढारी

पुणे : तर विद्यार्थ्यांसमोर अडचणी; वैद्यकीय महाविद्यालय समस्यांच्या गर्तेत

पुणेय पुढारी वृत्तसेवार: महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या ‘क्लिनिकल प्रॅक्टिस’साठी सर्व सुविधा उपलब्ध नाहीत. कमला नेहरू रुग्णालयातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत न झाल्यास विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नायडू रुग्णालय परिसरातील प्रयोगशाळांचे कामही मार्गी लागलेले नाही.

नायडू रुग्णालयातील इमारतीच्या कामाचे टेंडर मागील बैठकीत मंजूर झाले. मात्र, तेथील वसतिगृहाच्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. त्या कामाची निविदा प्रक्रिया दुसर्‍या टप्प्यात असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे दुसर्‍या वर्षासाठी लागणार्‍या प्रयोगशाळांचे नायडू रुग्णालयाच्या परिसरातील काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नॅशनल मेडिकल कमिशनच्या पथकाने अचानक भेट दिल्यास त्रुटी समोर येऊ शकतात.

सर्वसाधारणपणे दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्गाची प्रवेश प्रक्रिया संपून वर्ग सुरू होतात. मात्र, पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला उशिरा मान्यता मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. यंदा गेल्या आठवड्यात नीट परीक्षेचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी विचारणा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सर्व निर्णय वेगाने घ्यावे लागणार आहेत.

कामकाज ‘मॉनिटर’ होणार
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, कमला नेहरू रुग्णालय येथील सर्व कॅमेरे लवकरच नॅशनल मेडिकल कमिशनच्या सर्व्हरशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचे कामकाज बारकाईने ‘मॉनिटर’ होणार आहे.

सर्व यंत्रणा पीपीपी तत्त्वावर?
वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील सर्व यंत्रणा पीपीपी तत्त्वावर करण्याचा महापालिकेचा मानस आहे. दुसर्‍या वर्गापासून प्रत्यक्ष क्लिनिकल प्रॅक्टीसला सुरुवात होते. सध्या कमला नेहरू रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या सरावासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. सर्व विभाग कार्यक्षमतेने सुरू होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Back to top button