सावधान.. ही वाट स्मशानात जाते ! प्रशासन सुस्त अन् लोकप्रतिनिधी मस्त | पुढारी

सावधान.. ही वाट स्मशानात जाते ! प्रशासन सुस्त अन् लोकप्रतिनिधी मस्त

विजय सोनवणे : 

खेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील अनेक मुख्य रस्ते सध्या सुसाट झाले असताना, सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र हे सर्वच रस्ते अक्षरशः वाहन चालकांच्या जीवावर उठले आहेत. रस्त्यांवर दिशादर्शक फलक व वळणांवर गतीरोधक नसल्याने सर्वात जास्त अपघात होत आहेत. खेड-करमणवाडी या मार्गावर अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. नुकत्याच झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सुनील किसन देवकते (वय 30, रा. विहाळ, ता. करमाळा, जि. सोलापुर) हा युवक जखमी झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कारखान्यामुळे करमनवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये रस्त्यांची दर्जेदार कामे झाली आहेत. मात्र ठेकेदारांनी रस्ते सुसाट बनवून इतर बाबींकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका वाहनचालकांना बसू लागला आहे.

काही ठिकाणी काटकोनी वळणे, गतीरोधकांचा अभाव, गावांची नावे, अंतरांचे फलक, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर आदी बसवण्याकडे ठेकेदारांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे. रस्त्यांच्या विकासामध्ये ठेकेदारांनी केलेल्या दुर्लक्षाप्रकरणी मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.  येथून मागच्या काळात रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशा आणि ठेकेदारांच्या निकृष्ट कामांच्या पद्धतीमुळे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राज्यात गाजला होता. काही ठेकेदार तर निकृष्ट कामांमुळे कुख्यात झाले आहेत. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या घोषणाही हवेत विरल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या सुरक्षिततेअभावी आणखी किती जणांचे बळी जाणार, असा सवाल वाहनचालक व नागरिकांना पडला आहे.

रस्त्याचा दर्जा उत्तम आहे. परंतु फलकच लावले नाहीत. अनेक धोकादायक वळणांवर साईडपट्ट्या भरण्यासाठी रस्त्याच्या बाजूचा मुरूम काढल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये दगड टाकले आहेत. या खड्ड्यांतील दगडांमुळे दुचाक्या घसरुन अपघात होतात. याला ठेकेदारच जबाबदार असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
                                                     – सुनील खराडे ग्रामस्थ, करमनवाडी

Back to top button