नगर : यंदा लाल कांद्यावर येणार संक्रात | पुढारी

नगर : यंदा लाल कांद्यावर येणार संक्रात

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची रोपं टाकली होती. परंतु खराब हवामानीचा फटका बसल्याने जवळपास 70 टक्के रोपे जळून गेली आहेत. त्यामुळे लाल कांद्याची लागवड घटणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. आषाढी एकादशीला लाल कांद्याचे रोप टाकण्याचे काम शेतकरी सुरू करतात. तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची रोपे टाकण्यात आली होती. परंतु ढगाळ वातावरण, सततचा पाऊस, तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव, यामुळे रोपांवर बुरशी व मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन सुमारे 70 टक्के रोपे जळून गेली. शेतात पिकांची फेरपालट होत नसल्याचाही पिकांवर परिणाम झालेला दिसून येतो. चार ते पाच हजार रुपये पायली या भावाने बियाणांची खरेदी करून शेतकर्‍यांनी लाल कांद्याची रोपे टाकली होती. परंतु खराब हवामानाचा फटका बसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नगर तालुक्यात लाल कांद्याचे विक्रमी उत्पादन होते. डोंगर उतार व पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत लाल कांद्याचे उत्पादन जास्त होते. गर्भगिरीच्या डोंगर रांगांच्या पायथ्याशी लाल कांदा जोमात येतो. परंतु रोपेच जळून गेल्याने या वर्षी लाल कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज आहे. लाल कांद्याची रोपे जळून गेल्याने शेतकरी आता रांगडा कांद्याकडे वळला आहे. रांगडा कांद्याची लागवड लाल कांद्याच्या लागवडीनंतर व गावरान कांद्याच्या लागवडीपूर्वी केली जाते. रांगडा कांद्याची रोपे टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तालुक्यात रांगडा कांद्याच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

नगर तालुक्यात बाजरीचे पीक जोमात होते. बाकीच्या खरीप पिकांच्या उत्पादनात देखील घट झाली. लष्करी अळीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होईल. ढगाळ वातावरणामुळे मुगाच्या पिकात देखील घट झाल्याचे दिसून आले आहे. लाल कांद्याची रोपे वाया गेल्याने उत्पादनात घट होणार आहे.

कांद्याच्या पठारालाही फटका
ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर, जेऊर परिसराला तालुक्यात लाल कांद्याचे पठार म्हणून ओळखले जाते. येथील कांद्याची गुणवत्ता व विक्रमी उत्पादन राज्यात प्रसिद्ध आहे. परराज्यातील अनेक व्यापारी या भागांमध्ये स्थायिक होऊन कांद्याचा व्यापार करत आहेत. जेऊर पट्ट्यात देखील लाल कांद्याच्या रोपाला मोठा फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे.

नवीन कांद्याचे रोप टाकताना शेतकर्‍यांनी बुरशीनाशक बीजप्रक्रिया करावी. वेळोवेळी बुरशीनाशक औषध पाण्यातून द्यावे. तसेच शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. एकच पीक न घेता पिकांची फेरपालट करावी.
                                  – संदीप काळे  कृषी सल्लागार, साईनाथ कृषी उद्योग

Back to top button