नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच | पुढारी

नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वस्त धान्य वितरण प्रणालीअंतर्गत ‘ई-पॉस’मधील सॉफ्टवेअर अपडेशननंतरही मशिन्स‌्च्या समस्या कायम आहेत. सर्व्हर डाउनमुळे मशीन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना धान्य उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य लाभार्थ्यांची परवड होत आहे.

पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानांमधून महिन्याकाठी लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जाते. मात्र, गेल्या महिनाभरापासून या मशीनमध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत. धान्य देतेवेळी मशीनवर लाभार्थ्यांचा थम न उमटणे, वारंवार सर्व्हर डाउन होेणे, मधूनच मशीन बंद पडणे तसेच धान्य वितरणाची पावती न मिळणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. लाभार्थ्यांची होणारी परवड बघता पुरवठा विभागाने गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील २ हजार ६०९ रेशन दुकानांमधील ई-पॉस मशीनमधील सॉफ्टवेअर अपडेट केले. त्यानंतर मशीन सुरळीत होईल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र, अपडेशननंतरही मशीनचे रडगाणे सुरूच असल्याने ऐन सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. वेळेत धान्य मिळत नसल्याने सर्वसामान्यांच्या रोषाला दुकानदारांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे मशीनची समस्या तातडीने दूर करावी, अशी मागणी रेशन दुकानदार करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button