वडगाव शेरी : ड्रेनेज झाकणांमुळे रस्ते असमतल | पुढारी

वडगाव शेरी : ड्रेनेज झाकणांमुळे रस्ते असमतल

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा: नगर रोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कल्याणीनगर, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर परिसरातील अनेक ड्रेनेजचे झाकण (मॅनहोल) रस्त्यांलगत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मॅनहोलची त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. कल्याणीनगर बंगलासमोर, आपले घर सोसायटी, संत तुकाराम नगर, खराडी, वडगाव शेरीतील गणेश नगरमधील अंतर्गत रस्ते, तसेच विमानगरमधील अनेक रस्त्यांवरील ड्रेनेजची झाकणे रस्त्याशी समतल नाही.

यामुळे रस्त्यावर प्रत्येकी शंभर मीटरवर खड्डे झाले आहेत. रस्ता दुरुस्त करताना डांबरीकरण व्यवस्थित केले नाही. यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी चढ-उतार आहेत. यामुळे दुचाकी वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसत नाहीत. यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. या मॅनहोलमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी म्हणतात, मुख्य खात्याने रस्ता केला आहे.

यामुळे क्षेत्रीय कार्यालय काम करू शकत नाही, अशी कारणे देतात. महापालिकेच्या मुख्य विभाग आणि क्षेत्रीय कार्यालय यांच्यातील कामाच्या वादामुळे ही कामे कागदावरच आहेत. वडगाव शेरी विकास प्रतिष्ठानाचे अध्यक्ष शिवाजी वडघुल म्हणाले, ‘गणेशनगर आणि संत तुकाराम नगरमधील अंतर्गत रस्त्यांवरील ड्रेनेजची झाकणे रस्त्याशी समतल नाही. यामुळे खड्डे तयार झाले असून, अपघातही होत आहेत.’

क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेच्या मुख्य खात्यातील अधिकार्‍यांचा विकासकामांबाबत परस्पर समन्वय नाही. यामुळे ड्रेनेजची झाकणे दुरुस्त होत नाहीत. गोल आणि चौकोनी चेंबरला वेगवेगळे अधिकारी आहेत. त्यामुळे चेंबर लवकर दुरुस्त होत नाहीत.

                                                  -उद्धव गलांडे, अध्यक्ष, शिवकर्म प्रतिष्ठान

Back to top button