Nashik Crime : तोतया नागा साधूचा शहरात धुमाकूळ | पुढारी

Nashik Crime : तोतया नागा साधूचा शहरात धुमाकूळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तोतया नागा साधूने एका वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेली, तर दुसर्‍या घटनेत सोन्याच्या चेनमध्ये रुद्राक्ष लावून देण्याच्या बहाण्याने लबाडीने चेन नेल्याची घटना मंगळवारी (दि.23) सकाळी घडली. या प्रकरणी म्हसरूळ व मुंबई नाका पोलिस ठाण्यात जबरी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्ध्या तासात घडलेल्या दोन घटनांमुळे तोतया नागा साधूंचा धुमाकूळ समोर आला आहे.

भगीरथ रामचंद्र शेलार (69, रा. दिंडोरी रोड) हे मंगळवारी (दि.23) सकाळी 6.15 च्या सुमारास किशोर सूर्यवंशी मार्गावरून जात होते. त्यावेळी ओमकारनगर परिसरात पांढर्‍या रंगाच्या कारमधून चार संशयितांपैकी एकाने भगीरथ यांना त्र्यंबकेश्वरकडे जाण्याचा मार्ग विचारला. त्याचवेळी कारमधून एक निर्वस्त्र संशयित खाली उतरला. तो नागा साधू म्हणून वावरत होता. त्याने शंभर रुपये व रुद्राक्षाचा मनी देऊन आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने भगीरथ यांच्या गळ्यातील 35 हजार रुपयांची 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ओरबाडून नेली. या प्रकरणी भगीरथ यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. तर दुसर्‍या घटनेत उत्तम रामचंद्र परदेशी (75, रा. गोविंदनगर, लिंक रोड) हेदेखील मंगळवारी सकाळी 6.45च्या सुमारास आर. डी. सर्कलजवळून पायी जात असताना पांढर्‍या रंगाची कार आली. कारमधून निर्वस्त्र व्यक्ती खाली उतरला. त्याच्यासोबत एक महिला व एक पुरुषही होता. त्यांनी उत्तम परदेशी यांना पंचवटीकडे जाण्याचा मार्ग विचारत बोलण्यात गुंतवून ठेवले. तोतया नागा साधूने परदेशी यांना त्यांच्याकडील सोन्याच्या चेनमध्ये रुद्राक्ष लावून देतो तुमचे कल्याण होईल, असे सांगितले. त्यामुळे परदेशी यांनी त्यांच्याकडील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन तोतया नागा साधूस दिली. त्यानंतर नागा साधू व इतर संशयित कारमधून निघून गेले. काही वेळानंतर परदेशी यांना त्यांच्याकडील सोन्याची चेन नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाणे गाठून संशयितांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस पथके मागावर
दोन्ही घटनांमध्ये एकच संशयित असल्याचा अंदाज आहे. संशयितांच्या वाहनास नंबरप्लेट नसल्याचे सीसीटीव्हीतून दिसते. सकाळच्या वेळी वृद्ध व्यक्तींना लक्ष करून या टोळीने दागिने ओरबाडून व लबाडीने नेले आहेत. काही मिनिटांत या टोळीने पोबारा केल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.

हेही वाचा :

Back to top button