विश्रांतवाडीमध्ये चोवीस दस्तांची नियमबाह्य नोंदणी; चौकशी अहवालात प्रभारी सबरजिस्ट्रारवर ठपका | पुढारी

विश्रांतवाडीमध्ये चोवीस दस्तांची नियमबाह्य नोंदणी; चौकशी अहवालात प्रभारी सबरजिस्ट्रारवर ठपका

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: तुकडेबंदी कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून आर्थिक लाभाकरिता विश्रांतवाडी येथील प्रभारी सबरजिस्ट्रार अमित अविनाश राऊत (रा. पिंपरी) याने 24 खरेदीखत केल्याचे उघडकीस आले. नोंदणी महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी चौकशी अहवाल तयार केला असून अमित राऊत यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांच्याकडे पाठविला आहे. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राऊत हे सुटीवर गेले आहेत.

पारखे यांनी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, अमित राऊत हे वरिष्ठ लिपिक असून, त्यांच्याकडे विश्रांतवाडी येथील हवेली सह-दुय्यम निबंधक वर्ग 2 हवेली क्रमांक आठचा प्रभारी सबरजिस्ट्रार म्हणून काही दिवस कार्यभार होता. त्यांच्या काळात दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी राऊत यांनी वैयक्तिक आर्थिक लाभाकरिता तुकडेबंदी सर्व कायद्याचे, नियमांचे उल्लंघन करून एका दिवसात 24 दस्तांची नोंदणी केल्याचे समोर आले आहे.

याबाबत नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी कार्यालयातील दस्तांची तपासणी करण्याचे आदेश सह-जिल्हा निबंधक अनिल पारखे यांना दिले होते. यानंतर झालेल्या चौकशीत प्रभारी अमित राऊत यांनी वाघोली, वडकी, तळेरानवाडी, केसनंद, लोणीकंद आदी पुणे शहर उपनगरालगतच्या परिसरातील जागेची बेकायदेशीर नोंदणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दस्त तपासणीत 8 परिच्छेदांमध्ये 13 लाख 44 हजार 900 रुपये इतके कमी शुल्क आकारल्याचे निदर्शनास आले आहे. जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध असताना शेती व ना-विकास झोन दाखले दस्तावेजास भाग करण्यात आले आहेत.

‘मी 25 प्रकरणांची तपासणी केली असता नियमबाह्य दस्त नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. आणखी डीआयजी कार्यालयाची टीम चौकशी करत असून दोन-तीन दिवसांत आणखी काही दस्त नोंदणी झाली आहे का, हे समोर येईल’

                                             -अनिल पारखे, सह जिल्हा उपनिबंधक

Back to top button