वहागाव, तळबीड परिसरातील चंदनाच्या शेकडो झाडांची कत्तल | पुढारी

वहागाव, तळबीड परिसरातील चंदनाच्या शेकडो झाडांची कत्तल

तासवडे टोलनाका: पुढारी वृत्तसेवा वहागाव, तळबीड, वनवासमाची आणि वराडे परिसरातील चंदनाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर अक्षरशः कत्तल सुरू आहे. चोरट्यांकडून वृक्षतोडीसोबतच परिसरातील शेतकर्‍यांच्या शेत मालाचेही मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळेच पोलिस व वनविभागाने योग्य ती उपाययोजना करत चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांसह शेतकर्‍यांकडून होत आहे.

वहागाव, तळबीड, वनवासमाची, वराडे परिसरात डोंगर असल्याने मोठी वनसंपदा लाभली आहे. तसेच कृष्णा नदीमुळे परिसरातील जमीन मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली आली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी आवडीने आपल्या बांधावर विविध झाडांसह चंदनाचीही झाडे लावली आहेत. बाजारपेठेत चंदनाच्या लाकडाला खूप मोठी मागणी असून चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून या परिसरातील चंदनाच्या झाडावर चोरट्यांची वाईट नजर पडल्याचे पहावयास मिळते.

या परिसरातील चंदनाची झाडे अचानक गायब होऊ लागली आहेत. दरम्यान वहागाव, तळबीड, वनवासमाची आणि वराडे या परिसरात गेल्या दहा दिवसांपासून चंदनाची झाडे तोडून ती चोरून नेण्याचा प्रकार पुन्हा चालू झाला आहे. वहागावमधील गवळी शिवार, मार्ग शिवार, वनवासमाचीतील धर्मराज शिवार, तळबीडमधील नाईकबा डोंगर तर वराडे येथील खरजुली मंदिर शिवार या परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या बांधावरील तसेच डोंगरातील चंदनाची शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत.

जी झाडे तोडण्यात आली, त्यामध्ये लहान व मोठे दोन्ही प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. काही झाडावर चंदन तयार झाले का ? हे पाहण्यासाठी चोरट्यांनी कुर्‍हाडीसारख्या हत्याराने कचही घातलेला दिसून येत आहे. चंदनाच्या झाडाचा माग काढत असताना झाड मिळाले नाही, तर शेतकर्‍यांचा शेतातील भाजीपाला चोरून नेत भाजीपाला व पिकांचे नुकसान करण्याचे प्रकारही चोरट्यांकडून घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

‘ते’ आल्यावरच घडतात घटना

वहागाव परिसरात दरवर्षी काही विशिष्ट लोक वास्तव्यासाठी येत असतात. परिसरात ते दोन ते तीन महिने तंबू उभारून थांबलेले असतात आणि नेमके हे लोक आल्यावरच चोरीच्या घटना घडतात. चंदनाच्या झाडांसह दुचाकीच्या बटर्‍या, शेती पंपाचे स्टार्टर गायब होतात. त्यामुळे स्थानिकांचा संबंधित लोकांवर संशय असून ‘त्या’ वास्तव्यास आलेल्या लोकांची चौकशी होणे गरजेचे आहे.

Back to top button