‘पांढरं सोनं’ संकटात | पुढारी

‘पांढरं सोनं’ संकटात

हवामान बदलामुळे कापूस उत्पादनात विक्रमी घसरण नोंदली गेली आहे. परिणामी, जगभरातील जवळपास सर्वच कापूस उत्पादक देशांत कापसाच्या किमती भडकल्या असून त्यामुळे वस्त्रोद्योगासमोर आव्हान उभे राहिले आहे. भारतातील कापसाच्या किमती या वर्षभरात दुप्पट झाल्या आहेत. उत्तर भारतातील महत्त्वाचे शहर पानीपत येथून जगभरात कापसाची निर्यात केली जाते. पानी एक्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष ललित गोयल यांच्या मते, यंदा कापसाच्या गाठीने विक्रमी भाव मिळवला आहे. पहिल्यांदाच 330 रुपये प्रतिकिलो भाव झाला आहे. भाववाढीमुळे उत्तर भारतासह देशातील अन्य भागांतील वस्त्रोद्योगांना आपल्या खर्चात कपात करावी लागली किंवा उत्पादन पूर्णपणे बंद करावे लागले.

आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि कापसाची आयात वाढविण्यासाठी अन्य प्रकारच्या सवलती दिल्यानंतर देशातील उद्योगांवर आणखीच संक्रांत कोसळली. वस्त्रोत्पादनासाठी वाढलेला खर्च आणि अनेक देशांत आर्थिक मंदीमुळे कपड्याच्या मागणीत झालेली घसरण पाहता वस्त्रोद्योगातील सर्व भागीदारांच्या मार्जिनवर नकारात्मक परिणाम झाला आहे. यात सूत तयार करणार्‍याबरोबरच वस्त्र निर्माते आणि निर्यातदारांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. अनेक वस्त्रोद्योगांना कापसात रेयान किंवा पॉलिस्टरसारख्या गोष्टी मिसळाव्या लागत आहे. जेणेकरून आगामी काळात कापसावरची अवलंबिता कमी होईल आणि खचही कमी होईल.

जगात अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि दुष्काळ, उष्णतेची लाट येत आहे. या परिस्थितीचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला आहे. कापूस निर्यातीची आणि आयातीची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत आणि पाकिस्तान यासारख्या देशांतील गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. कापसाच्या जागतिक बाजारपेठेत चाळीस टक्के भागिदारी असलेला आणि सर्वात मोठा निर्यातदार असलेेल्या अमेरिकेत कापसाचे उत्पादन 28 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. या महिन्यात सुरू होणार्‍या नव्या हंगामातदेखील कापूस उत्पादन 2010 नंतर प्रथमच नीचांकी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. बहुतांश देशात कापसाची साठवणूक ही कमी झाली आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाचा कापूस निर्यातदार देश ब्राझीलमध्येदेखील पावसाचे प्रमाण कमी आहे. उच्च तापमानाने ब्राझील हैराण झाला आहे. म्हणून पीक उत्पादन 30 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. चीनदेखील कापसाचा मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. तेथेही दुष्काळ पडला आहे. अशावेळी चीनमध्ये कापसाचे पीक कमीच राहू शकते.

भारतातही कापूस उत्पादन समाधानकारक पातळीवर नाही. किमती वाढल्याने कापसाचे भाव वधारलेले असले, तरी उत्तर भारतात किटकांमुळे आणि दक्षिणेत मुसळधार पावसामुळे कापसाच्या उत्पादनाला फटका बसत आहे. देशातील सर्वात मोठे वस्त्रोद्योग तामिळनाडूत असून तेथेही अनेक सूतगिरण्या, वस्त्रोद्योग बंद पडले आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी काही कारखाने बंद पडू शकतात. एवढेच नाही, तर लगतचे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील कॉटन मिल बंद होण्याच्या शक्यता आहे. हवामान बदलामुळे सध्याचे वातावरण खूप बदलले आहे. हे पीक हवामान बदलापासून सुरक्षित नाही.

ताज्या आकडेवारीनुसार दोन आठवड्यांपूर्वी देशभरात 123.10 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. याच काळाची तुलना केल्यास गेल्या वर्षी ही लागवड 116.2 लाख हेक्टर होती आणि यानुसार यंदा 6 टक्के वाढ दिसून येत आहे. परंतु, हवामान बदलामुळे शेतकर्‍यांच्या हाती किती पीक पडू शकते, याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही. देशातील कापूस क्रांती संंपूर्णपणे बीटी कॉटन हायब्रिडवर अवलंबून राहिली असून ती बोंडअळीसारख्या कीटकांच्या हल्ल्यांपासून वाचू शकते. परंतु, प्रतिकूल हवामानात तग धरू शकत नाही. म्हणून जगभरातील संशोधकांना आता काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. वातावरणाला अनुकूल असणारे गुणवत्तापूर्ण पीक कसे घेता येईल, याचा विचार करावा लागणार आहे.

– विलास कदम,
कृषी अभ्यासक

Back to top button