बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर | पुढारी

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर

 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

सुनील मरकड; खुलताबाद पुढारी वृत्तसेवा : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी अखेरचे ज्योतिर्लिंग वेरूळ येथील प्रसिद्ध महादेवाचे मंदिर ‘श्री घृष्णेश्वर’. घृष्णेश्वर मंदिर हे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेण्यांजवळ आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरविण्यात येते. भविकांसाठी दररोज मंदिर सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते.

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ गावात (ता. खुलताबाद) घृष्णेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराची पुनर्बांधणी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६व्या शतकात केली. या मंदिराचे पुनर्निर्माण 18 व्या शतकामध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी केले. पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तुकलेचा उत्तम उदाहरण म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर.

श्री घृष्णेश्वर

मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम लाल रंगाच्या दगडाने केलं गेलं आहे. या मंदिराचे बांधकाम 4400 चौरस फूट क्षेत्रावर झाले आहे. मंदिर परिसरामध्ये पाच स्तरीय उंच शिखर आहे. त्यासोबतच २४ स्तंभदेखील आहेत. मंदिराच्या परिसरात असणार्‍या लाल दगडांच्या भिंती भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या दहा अवतारांचे दर्शन घडवतात. १७ बाय १७ फूट आकाराच्या गर्भगृहात पूर्वमुखी शिवलिंग आहे आणि मंडपात नंदीची मूर्ती आहे.

हेमाडपंथी शैलीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचे नक्षीकाम अतिशय सुबक आहे. मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात तर कळसाकडील अर्धा भाग हा विटा, चुन्यात बांधलेला आहे. मंदिराच्या भिंतीवर पौराणिक कथेतील दृश्य कोरण्यात आले आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा कळस सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनी भागापासून पूर्वेकडच्या पाय-याखाली उतरल्यानंतर डाव्या बाजूस शिलालेख दिसतो.

मंदिरापासून साधारण 500 मीटर अंतरावर वेरूळ येथे शिवालय तीर्थ या नावाने प्रसिद्ध कुंड आहे. हे तीर्थकुंड एक एकर परिसरात असून चारही बाजूने आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहेत. या कुंडाला एकूण 56 दगडी पाय-या आहेत. या शिवालय कुंडात महादेवाची आठ मंदिरे आहेत. ही मंदिरे भारतातील अष्टतीर्थांची प्रतिकात्मक बांधकामे आहेत, असे सांगितले जाते. यात उत्तरेस काशी, ईशान्येस गया तीर्थ, पूर्वेस गंगा तीर्थ, आग्नेयेला विरज तीर्थ, दक्षिणेस विशाल नैऋत्येस नाशिक तीर्थ, इत्यादी आहेत. महिन्यातील प्रत्येक सोवारी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येथे राज्यासह परप्रांतातून दर्शनासाठी हजारो भाविक येतात असतात. 

श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी जास्त असते. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी येथे यात्रेचे स्वरूप येते. भविकांसाठी दररोज मंदिर सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कथा
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी सुधर्मा आणि सुधा या जोडप्याच्या कथेपासून सुरू होते. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते, परंतु ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेहा कधीही आई होऊ शकत नाही. म्हणून सुदेहाने तिचा पती सुधर्मा हिची धाकटी बहीण घुश्मासोबत लग्न केले. घुश्मा ही शिवभक्त होती. ती दररोज सकाळी उठून 101 शिवलिंगे बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे. वेळ गेला आणि घुश्मेपासून, एक सुंदर मुलाचा जन्म झाला. पण सुधा मात्र हळू हळू तिच्या हातातून तिचा पती, प्रेम, घर आणि आदर जात असल्याचे पाहून तिच्या मनात ईर्षेची बीजं फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि त्याच तळ्यामध्ये त्याचे शरीर त्या तलावात दफन केले ज्यात घुश्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती.
मुलाची बातमी ऐकून चहूबाजूंनी आक्रोश झाला, पण दररोज प्रमाणेच, घुश्माही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली, तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला. त्याच वेळी भगवान शिवाने घुश्माला प्रत्यक्ष दर्शन दिले, भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा आणि घुश्माला वरदान देऊ इच्छित होते. पण घुश्माने सुधेला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली. घुश्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले.

हेही वाचलंत का?

Back to top button