हवेलीतील नेटकऱ्यांची खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर टीकेची झोड | पुढारी

हवेलीतील नेटकऱ्यांची खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर टीकेची झोड

सिताराम लांडगे

लोणी काळभोर: लोणी काळभोर येथे अपघातात दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध हवेली तालुक्यात समाजमाध्यमावर नेटकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त करून त्यांच्यावर प्रचंड टीकेची झोड ऊठवली आहे.
दरम्यान या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर  हडपसर पंधरा नंबर ते ऊरुळी कांचन महामार्ग अपघात प्रणवक्षेत्र घोषित करुन अपघात होऊ नये म्हणून ऊपाययोजना करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.

समाजमाध्यांमावर खासदार कोल्हे यांच्याबाबत आपण यांना पाहिलंत का? शिरुर लोकसभेचे खासदार हरवलेत सोलापूर महामार्गावर अजून किती लोकांनी प्राण गमवायचे म्हणजे खासदार साहेब कार्यवाही करतील. असे संदेश फिरत आहेत, या संदेशाने संपुर्ण हवेली तालुक्याचे लक्ष वेधले आहे. पुणे सोलापूर महामार्गावर शनिवारी लोणी काळभोर येथील दोन शाळकरी सख्या बहिणींचा अपघातात दुर्दवी मृत्यू झाला यानंतर खासदार अमोल कोल्हे यांचे हवेली तालुक्यात असलेले दुर्लक्ष चव्हाट्यावर आले. खासदार या भागात फिरकतच नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. समाजमाध्यमावर तर प्रचंड सडकुन टिका सुरू आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात इतर तालुक्यात महामार्गावर प्रचंड निधी आणल्याची खासदारांची जाहीरातबाजी चालु आहे, मग हवेली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाकडे दुर्लक्ष का? असा संतप्त सवाल होऊ लागला आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत या महामार्गावर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काही विद्यार्थी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. येथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदारवाली नाहीत यासह समाज माध्यमावर कोल्हे यांना निवडून दिल्याचा पश्चात्ताप, मत वाया गेले, नेता निवडायचा असतो अभिनेता नाही, खासदार गायब, कोणाला दिसले तर कळवा अशा खोचक टीका टिप्पणी अमोल कोल्हे यांच्यावर होत आहे

उपाययोजना करणार: खासदार डॉ. कोल्हे
या संदर्भात खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पंधरा नंबर हडपसर ते ऊरुळी कांचन महामार्ग अपघात प्रणवक्षेत्र घोषित करुन अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. वाहनांना शिस्त लावण्याबाबत नियोजन करणार आहे. इतर राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे सोलापुर महामार्गावर अधिक दर्जेदार सुविधा पुरविणार आहे, तसेच हवेली तालुक्यांतील नागरीकांशी नेहमी समस्या सोडविण्याबाबत संपर्क असतो यापुढे अधिक जनसंपर्क वाढविला जाईल.

Back to top button