नाशिक : …अखेर मुलांचा ताबा मिळाला अन् पोलिस निघाले कर्नाटकला, काय आहे प्रकरण? तुम्हीच वाचा | पुढारी

नाशिक : ...अखेर मुलांचा ताबा मिळाला अन् पोलिस निघाले कर्नाटकला, काय आहे प्रकरण? तुम्हीच वाचा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून आईने दोन मुलांना घेऊन नाशिक गाठले. मात्र, पित्यानेही मुलांचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयीन लढा दिला. कर्नाटक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पिता कर्नाटक पोलिसांसह नाशिकला आला. मात्र, मुलांचा ताबा देण्यास नकार देणार्‍या आईची समजूत काढताना कर्नाटक पोलिस आणि नाशिक पोलिसांना नाकीनऊ आले. अखेर पोलिसांनी आईची समजूत काढल्यानंतर मुलांचा ताबा कर्नाटक पोलिसांकडे सोपवला आणि मुलांना घेऊन पोलिस कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले.

नाशिकचे माहेर असलेल्या उत्तरभारतीय महिलेचा बंगळुरूच्या व्यक्तीसोबत विवाह झाला. दोघांना अकरा आणि आठवर्षीय मुलगी व मुलगा आहे. मात्र, कौटुंबिक वादाला कंटाळून महिला काही महिन्यांपूर्वी पतीस न सांगता दोन्ही मुलांना घेऊन नाशिकला गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माहेरच्या नातलगांकडे आली. पतीने वारंवार संपर्क साधूनही पत्नीने अजिबात प्रतिसाद दिला नाही. अखेर पतीने न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे मुलांचा ताबा कोणाकडे राहील यावर निर्णय देण्यासाठी न्यायालयाने दोन्ही मुलांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश कर्नाटक पोलिसांना दिले. त्यानुसार दोन्ही मुलांचे पिता कर्नाटक पोलिसांसह नाशिकला आले. मुलांचा ताबा मिळावा यासाठी पोलिसांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी बुधवारी (दि.17) महिलेचे घर गाठले. मात्र, महिलेने मुलांचा ताबा देण्यास नकार दिला. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली तरी महिला ऐकत नसल्याने त्यांनी महिलेस पोलिस आयुक्तालयात नेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकार्‍यांनी महिलेची समजूत काढल्यानंतर तिने दोन्ही मुलांचा ताबा कर्नाटक पोलिसांकडे सोपवला. या घडामोडींमध्ये मात्र नाशिक व कर्नाटक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. एकीकडे पोलिसांसाठी भाषेचा अडसर, तर दुसरीकडे आईचा मुलांना न सोडण्याचा हट्ट, पित्याची मुलांसाठीची तळमळ यामुळे कोणाला मनस्ताप, कोणाला दु:ख तर कोणाला दिलासा मिळाल्याचे अजब चित्र पाहावयास मिळाले.

हेही वाचा :

Back to top button