पोलिस असल्याचे सांगून महिनाभरात वृद्धांना फसविल्याच्या तीन घटना | पुढारी

पोलिस असल्याचे सांगून महिनाभरात वृद्धांना फसविल्याच्या तीन घटना

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा :  शहरात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धांना समोर दंगल चालू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा, असे सांगून ते दागिने रुमालात बांधल्यासारखे करून फसवणूक केल्याच्या महिनाभरात तीन घटना घडल्या आहेत. यामुळे सोलापूरकरांना आता खरे पोलिससुद्धा नकली पोलिस वाटू लागलेत.

सध्या शहरात चोर्‍या, घरफोड्या, तसेच पोलिस असल्याची बतावणी करुन फसविणे, लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या शहरात एकट्या वृद्ध महिला अथवा वृद्धास मोटारसायकलवर येऊन गाठणे व त्यांना समोर दंगल सुरू आहे, तिकडे आमच्या पोलिसांचे चेकिंग सुरू आहे, तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा असे सांगून व ते दागिने एका रुमालात बांधल्यासारखे करून त्या रुमालात बारीक दगड बांधून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. महिनाभरात अशा तीन घटना घडल्या आहेत.

20 दिवसांपूर्वी संभाजी तलावाजवळील पत्रकार भवन चौक परिसरात एका तोतया पोलिसाने गाठले व आम्ही पोलिस आहोत, तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने एका कागदात बांधून ठेवण्यास सांगितले. नंतर हातचलाखी करुन स्वत: सोन्याच्या दागिन्याची कागदाची पुडी घेऊन त्या महिलेस दुसर्‍या कागदाची पुडी देऊन त्या महिलेची फसवणूक केली. त्याचदिवशी 1 तासाच्या अंतराने महावीर चौकातसुध्दा पोलिस असल्याची बतावणी करून तोतया पोलिसांनी एका वृद्धास लुटले. त्यानंतर 10 दिवसांनी अशीच घटना सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अशाप्रकारे पोलिस असल्याचे सांगून वृद्धांना फसविल्याच्या तीन घटना घडल्या.

आरोपींचा शोध सुरू आहे

वृद्कध नागरिकांना आम्ही पोलिस असल्याचे सांगून लुटणार्‍यांपैकी काही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच शहरात इतर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू व आरोपींचा शोधसुद्धा सुरू आहे, अशी माहिती शहर गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली.

Back to top button