शासनाकडून मदतीची घोषणा, तरीही पंचनामे नाहीच | पुढारी

शासनाकडून मदतीची घोषणा, तरीही पंचनामे नाहीच

सोलापूर : महेश पांढरे :  नुकसान झालेल्या भागातील पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देऊनही अद्यापपर्यंत ते अपूर्णच आहेत. दुसरीकडे शासनाने तीन हेक्टर पर्यंतच्या पिकांचे नुकसान झालेल्यांना मदत देण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे शासन आले द्यायला आणि पदर नाही घ्यायला, अशी अवस्था जिल्ह्यातील शेतकर्‍यांची झाली आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील जवळपास 22 हजार 904 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केली होती. त्यावर गेल्या 8 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झालेल्या भागातील पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिले होते. निवासी उपजिल्हाधिकारी
शमा पवार यांनी 8 ऑगस्ट रोजी आदेश जारी केले होते. त्यानंतर तब्बल 15 दिवस लोटले तरी कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवकांनी अद्याप पंचनामे पूर्ण केलेले नाहीत.

दुसरीकडे नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकर्‍यांना पूर्वी दोन हेक्टर पर्यंत मदत केली जात होती. त्यामध्ये आणखी एका हेक्टरचा समावेश केला असून आता तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अधिकचा फायदा होणार असला तरी पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत.

चार दिवसांत पंचनामे पूर्ण होतील ः शिंदे

ऑगस्टमध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची नजर अंदाजे माहिती शासनाला सादर केलेली आहे. येत्या चार-पाच दिवसांत हे पंचनामे पूर्ण होतील आणि जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेती पिकांची वस्तुनिष्ठ माहिती तातडीने शासनाला कळविली जाईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

तालुकानिहाय नुकसान असे

बार्शीतील 78 गावांतील 15,700 शेतकर्‍यांच्या 10,993 हेक्टर.
अक्कलकोटमधील 13 गावांतील 7,426 शेतकर्‍यांच्या 9,590 हेक्टर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील 11 गावांतील 2 हजार 557 शेतकर्‍यांच्या 1 हजार 587 हेक्टर क्षेत्राला फटका बसला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील 9 गावांतील 776 शेतकर्‍यांच्या 734 हेक्टर क्षेत्राला फटका बसला होता. यामध्ये बागायती, जिरायती क्षेत्रासह जवळपास 67.4 हेक्टर फळबागांचाही समावेश आहे.

Back to top button