कामकाजामध्ये गतिमानता गरजेची आहे ; मिलिंद शंभरकर 

कामकाजामध्ये गतिमानता गरजेची आहे ; मिलिंद शंभरकर 
Published on
Updated on

सांगोला : पुढारी वृत्तसेवा :  अडचणीच्या ठिकाणी कार्यालय असल्यामुळे अनेकदा कार्यालयीन कामकाजाला अडचण निर्माण होत होती. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने स्वतंत्र प्रशस्त कार्यालय उभे केले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची मोठी सोय होणार आहे. येणार्‍या काळामध्ये नवीन कार्यालयाच्या या सोयीसुविधा बघता कार्यालयामधील कामकाजामध्ये गतिमानता दिसून आली पाहिजे, अशा अपेक्षावजा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

सांगोला तालुक्यातील खरेदी- विक्रीसाठी असलेल्या महत्त्वाकांक्षी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आ. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जे. डी. गिते, अनिल पारखे, कार्यकारी अभियंता द. म. गावडे, तहसीलदार अभिजित पाटील, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, एस. बी. चव्हाण, उपकार्यकारी अभियंता मुलगीर, धर्मेंद्र काळोखे, शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष सूरजदादा बनसोडे, जिल्ह्याचे नेते अरुणअण्णा बनसोडे, आर. पी. आय. तालुकाध्यक्ष खंडूतात्या सातपुते, संभाजी ब्रिगेडचे नेते अरविंदनाना केदार, बापूसाहेब ठोकळे, बाळासाहेब बनसोडे, युवानेते गुंडादादा खटकाळे, शिवसेना शहराध्यक्ष कमरुद्दिनभाई खतीब, माजी नगराध्यक्ष अरुण बिले, पांडुरंग मिसाळ, संजय देशमुख, उद्योगपती सुरेशकाका चौगुले, दादा जाधव, रामदास काळे, सतीश काटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, सांगोला तालुक्यातील इतर कार्यालयेदेखील सुसज्ज आणि एकाच ठिकाणी होणार असून त्याचीही कामे लवकरच सुरू होणार आहेत. 6 कोटी रुपयांच्या गोडावूनचेही काम सुरू होईल. यामधून जनतेची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांची अडचण दूर होऊन गतिमानतेने कामकाज पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व शासकीय इमारतींच्या कामासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठा पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. शहाजीबापू पाटील म्हणाले, कोणत्याही कागदपत्राला वाळवी लागणार नाही, शॉर्टसर्किट झाले तरी एकाही कागद जळणार नाही, अशी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरुन कार्यालयाची निर्मिती केली आहे. 'कॉर्पोरेट ऑफीस' ही संकल्पना जागतिक बाजारपेठेत आली. इंग्रज काळानंतर अमेरिकेने व त्यानंतर भारतातदेखील कॉर्पोरेट इमारतीची गतिमानता मोठ्या प्रमाणात उभी केली आहे. अशाच पद्धतीचे कॉर्पोरेट कार्यालय आज सांगोल्यात उभे राहात आहे, याचा आनंद आहे.

सांगोला तालुक्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे श्रेणी एकचे अधिकारी यांच्यावर कामाचा ताण येऊन नागरिकांनाही दिवसेंदिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. यासंदर्भात माजी महसूलमंत्री यांच्याकडे दुय्यम निबंधक विभागात श्रेणी एकचे दुसरे एक पद मंजूर करावे. यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर विद्यमान महसूलमंत्री यांच्याकडे येत्या अधिवेशनात श्रेणी एक पद अधिकारी वाढवून द्यावा यासंदर्भात मागणी करणार आहे. शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी म्हणून आपण मदत करावी, असे सांगत सर्व कार्यालय एकाठिकाणी यासाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापुढील काळात निधीची कमतरता भासू नये म्हणून 6 कोटी रुपये वाढवून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. एका बाजूला विश्रामगृह इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दुसर्‍या बाजूला शॉपिंग सेंटर उभारण्याचे काम सुरू होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपालिकेच्या तांत्रिक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा करून द्यावा.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक जिल्हा निबंधक जे.डी. गिते यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी सांगोला तालुक्यातील गुंठेवारी बंद असल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन यापूर्वीप्रमाणे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू व्हावेत, अशी मागणी केली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनोज उकळे यांनी, तर आभार तांबोळी यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news