नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ | पुढारी

नाशिक : पावसाच्या पुनरागमनाने दारणा, कडवामधील विसर्गात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणांच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. दारणाचा विसर्ग 9 हजार 596, तर कडवामधून 2250 क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 87 टक्क्यांवर पोहोचला आहे.

अरबी समुद्रात मध्य महाराष्ट्रापासून ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात पाऊस परतला आहे. नाशिक जिल्ह्यातही घाटमाथा परिसरात त्याचा वेग अधिक आहे. त्या सोबत धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस परतल्याने तेथील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत मिळत आहे. जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये सद्यस्थितीत 56 हजार 917 दलघफू इतका म्हणजेच 87 टक्के उपयुक्त साठा आहे. गेल्या वर्षाशी तुलना केल्यास 33 टक्के अधिक साठा धरणांमध्ये आहे.  पावसाचा जोर कायम असून, धरणांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणांमधील विसर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दारणाच्या विसर्गात गुरुवारी (दि.11) 250 क्यूसेकवरून टप्प्याटप्प्याने वाढ करून तो 9,596 क्यूसेकवर नेण्यात आला. तर कडवामधूनही विसर्ग केला जात आहे. याशिवाय गौतमी-गोदावरीमधून 80, पालखेडमधून 810, वाघाडमधून 505, ओझरखेडमधून 267, तिसगावमधून 180, भोजापूरमधून 539, गिरणातून 7,128 व चणकापूर धरणामधून 523 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातो, तर नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या विसर्गात 22 हजार 85 क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या काळात धरणांमधील पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

धरणसाठा (दलघफू) : गंगापूर 4,274, दारणा 6,143, काश्यपी 1,767, गौतमी गोदावरी 1,680, आळंदी 816, पालखेड 390, करंजवण 4,408, वाघाड 2,302, ओझरखेड 2,130, पुणेगाव 506, तिसगाव 455, भावली 1,434, मुकणे 6,753, वालदेवी 1,133, कडवा 1,470, नांदूरमध्यमेश्वर 140, भोजापूर 361, चणकापूर 1,429, हरणबारी 1,166, केळझर 572, नागासाक्या 80, गिरणा 1,6814, पुनद 609, माणिकपुंज 85.

हेही वाचा:

Back to top button