Goa Panchayat Election Results : गोव्यातील १८६ पंचायतींच्या मतमोजणीला सुरूवात | पुढारी

Goa Panchayat Election Results : गोव्यातील १८६ पंचायतींच्या मतमोजणीला सुरूवात

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील १८६ पंचायतीच्या मतमोजणीला (Goa Panchayat Election Results) आज (दि.१२) सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यातील १८६ पंचायतीच्या मतमोजणीसाठी राज्यभरात २१ मतमोजणी केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. तिसवाडी तालुक्यातील मतमोजणी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे सुरू आहे. राज्यात १८६ पंचायतीच्या १४६४ प्रभागासाठी ५०३८ उमेदवार या लढतीत आहेत.

इंग्रजी अक्षरानुसार ही मतमोजणी होत असल्यामुळे, A नावाच्या पंचायतीपासून मतमोजणी सुरूवात झाली आहे. त्यानंतर लगेच निकाल बाहेर पडू लागले. जिंकलेले उमेदवार जल्लोष करीत आपल्या कार्यकर्त्यांसह बाहेर पडत आहेत, तर पराभूत झालेले उमेदवार हळूच एका बाजूने निघून जाताना दिसत आहेत. सर्वच मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी दिसून येते आहे. पंचायतीच्या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर झालेल्या नसल्या तरी, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार निवडून यावे यासाठी बरेच परिश्रम घेतलेले आहेत. विरोधीपक्ष असलेले काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, रिव्होल्युशनरी गोवन तसेच आम आदमी पक्ष या पक्षांनीही आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत.

निवडणुकीत अनेक ठिकाणी मंत्री, आमदार यांचे समर्थक उतरलेले असल्यामुळे त्या मंत्र्यांची आणि आमदारांची शक्ती पणाला लागलेली आहे. निवडून येणार ते आपले या नियमानुसार प्रत्येक आमदार निवडून येणाऱ्या उमेदवारावर लक्ष ठेवून आहेत. विजयी उमेदवाराला आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न करतानाही काही नेते दिसत आहेत. संध्याकाळी चारपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत.

यावेळी पंचायतीच्या निवडणुका (Goa Panchayat Election Results) मतपत्रिकाद्वारे घेण्यात आलेल्या असल्यामुळे काहीसा वेळ लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोव्यामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असल्यामुळे, मतदान केंद्राबाहेर जमा झालेल्या समर्थकांची बरीच तारांबळ उडत आहे. कारण मतदान केंद्राबाहेर मोठ्या समर्थक जमा झालेले असल्यामुळे, त्यांच्यासाठी निवारा शेडची सोय सरकारतर्फे किंवा राज्य निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलेले नाही. याबद्दल अनेक उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

Back to top button