ओझोनच्या थरात आणखी एक छिद्र | पुढारी

ओझोनच्या थरात आणखी एक छिद्र

टोरांटो :  पृथ्वीला सूर्याच्या घातक अशा किरणांपासून वाचवणार्‍या ओझोनच्या स्तरातील छिद्राबाबत अनेक वेळा चर्चा होत असते. ध—ुवीय प्रदेशाच्या वरील भागात या स्तरामध्ये हे छिद्र असून त्याचा आकार लहान-मोठा होत असतो. आता त्यापेक्षाही मोठ्या आकाराचे आणखी एक छिद्र ओझोनच्या स्तरात असल्याचा दावा कॅनडामधील एका संशोधकाने केला आहे.

जगातील 50 टक्के जनतेसाठी धोकादायक ठरू शकणारे हे अतिविशाल ओझोन छिद्र उष्णकटिबंधीय क्षेत्राच्या खालील भागात आहे. ‘एआयपी अ‍ॅडव्हान्सेस’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका नव्या अहवालात त्याची माहिती देण्यात आली आहे. हे नवीन ओझोन छिद्र ध—ुवीय भागातील ओझोन छिद्रापेक्षा तब्बल सातपटीने अधिक मोठे आहे. कॅनडाच्या ओंटारिओ येथील वॉटर्लू विद्यापीठाचे प्राध्यापक क्‍विंग बिन लू यांनी त्यांच्या संशोधनात त्याबाबतचा दावा केला आहे. हे नवीन ओझोन छिद्र 1980 पासून तिथे अस्तित्वात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या छिद्राची जागा बदलत नाही.

ध—ुवीय ओझोन छिद्राप्रमाणे ते ये-जा करीत नसून सुरुवातीपासून ते तसेच आहे. ही दोन्ही छिद्रे खोलीच्या बाबतीतही सारखी आहेत. ‘ओझोनचे छिद्र’ म्हणजे ओझोन थरातील अशी जागा जिथे या थराची पातळी अतिशय कमी असते. ज्यावेळी ही पातळी 220 डॉब्सन युनिटपेक्षा खाली घसरते त्यावेळी तिथे ओझोन छिद्र असल्याचे म्हटले जाते. ‘डॉब्सन युनिट’ हे ओझोनच्या पातळीचे मोजमाप करणारे मापक आहे.

Back to top button