नाशिक : पालकमंत्र्यांविनाच ध्वजारोहण! मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला : राज्यात पहिलीच घटना ठरणार | पुढारी

नाशिक : पालकमंत्र्यांविनाच ध्वजारोहण! मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला : राज्यात पहिलीच घटना ठरणार

नाशिक : गौरव जोशी
देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उप्रकम राबविण्यात येत असताना महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यंदा प्रथमच स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारी ध्वजारोहणाची परंपरा खंडित होण्याची शक्यता बळावली आहे.

यंदाच्या वर्षी देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अंतर्गत महाराष्ट्रात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. प्रशासकीय पातळीवर त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. घरोघरी तिरंगा पोहोचविण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सर्वत्र स्वातंत्र्यदिनासाठीची वातावरणनिर्मिती होत आहे. पण, त्याचवेळी राज्यातील सध्याचे सत्ताकारण बघता अमृतमहोत्सवी वर्षातच जिल्हानिहाय पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन 36 दिवसांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. सरकारमधील प्रमुख नेत्यांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दररोज नवनवीन मुहूर्त सांगितले जात असून, 15 ऑगस्टपूर्वी हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. पण, राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालात सुरू असलेला वाद बघता स्वातंत्र्यदिनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. त्यातही मंत्रिमंडळ विस्तार झाला तरीही पालकमंर्त्यांची नियुक्ती लगेचच केली जाईल, याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे या राजकीय पेचप्रसंगात स्वातंत्र्यदिनी पालकमंर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाच्या परंपरेला छेद बसणार असल्याची शक्यता आहे.

प्रशासनाला मार्गदर्शनाची प्रतीक्षा : पालकमंत्र्याच्या अनुपस्थितीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते पार पडणार हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता ध्वजारोहणाबद्दल शासनाकडून अद्याप मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली. दरम्यान, माजी अध्यक्ष, ओबीसी विकास महामंडळ डॉ. कैलास कमोद यांनी पालकमंर्त्यांच्या अनुपस्थितीत राज्यात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची परिस्थिती निर्माण झाल्याची तरी घटना नाही. राष्ट्रपती राजवटीच्या काळातच अशी वेळ उद्भवू शकते. पण, राष्ट्रपती राजवट 26 जानेवारी अथवा 15 ऑगस्ट या कालावधीत आल्याचे आठवत नाही. तसेच राष्ट्रपती राजवट 10 ते 15 दिवस किंवा महिनाभरापेक्षा अधिक वेळ राहिल्याचे आठवण नाही असे सांगितले.

हेही वाचा:

Back to top button