मुंबई; वृत्तसंस्था : 22 जानेवारी 2013… सात वर्षांच्या पूजाचे कुणीतरी अपहरण केले. आईने खूप शोध घेतला. पोलिसांत गेली. उपयोग झाला नाही. पूजाची ओळख आता 'मिसिंग गर्ल नंबर 166' अशीच उरलेली होती. पण नियतीने जणू पुनर्भेट लिहिलेली होती. आता पूजा 16 वर्षांची आहे. कुटुंबापासून दूर होऊन 9 वर्षे उलटली होती. नियतीचा खेळ बघा… मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात ती आपल्या खर्या घरापासून अर्धा किलोमीटरवर राहात होती. अखेरीस 4 ऑगस्ट ही तारीख उजाडली. रात्री 8.20 वाजता तिच्यासाठी जणू सूर्योदय झाला, ती आपल्या खर्या आईला भेटली…
पूजा गौड भावासोबत शाळेत जात होती. भावाशी भांडण झाले. ती रस्त्यात मागे राहिली. जोसेफ डिसुझा हा अपहरणकर्ता. शाळेजवळ तिला घुटमळताना त्याने पाहिले. जोसेफ व त्याची पत्नी सोनी यांना मुलबाळ नव्हते. दरम्यान, पूजाच्या शोधासाठी सारखी मोहीम सुरू होती. डिसुझा घाबरला. त्याने पूजाला कर्नाटकच्या रायचूर येथील एका होस्टेलवर पाठवून दिले. दरम्यान, 2016 मध्ये डिसुझा व सोनीला मूल झाले. डिसुझाने पूजाला रायचुरातून परत बोलावले. आपले घरही बदलले. ते अंधेरीच्या (पश्चिम) गिल्बर्ट हिल भागात येऊन राहू लागले. याच भागात पूजाचे खरे घर होते. पूजाची आबाळ सुरू झाली होती. तिला मोलकरणीसारखी वागणूक मिळत होती. पूजा मोठी झाल्यामुळे तिला आता कोणीही ओळखणार नाही, असा डिसुझाचा समज होता. डिसुझाने एकदा दारूच्या नशेत पूजाला उद्देशून, तुला आम्ही उचलून आणल्याचे सांगितले होते. यामुळे पूजाला ते आपले खरे वडील नसल्याचे समजले होते.
एकाने गुगलवर विविध कीवर्ड देऊन हरविलेल्या मुलींबाबत माहिती शोधली. एका बातमीत स्वतःचा फोटो पाहिल्यानंतर पूजाला सर्व काही आठवले. गुगलवर पूजाचे मिसिंग पोस्टरही सापडले. त्यावर 5 फोन नंबर होते. चार लागले नाहीत. पाचवा नंबर शेजारी रफीक काकांचा होता. तो लागला आणि… 4 ऑगस्टला रात्री 8.20 वाजता पूजा आणि तिची आई 9 वर्षांनंतर परस्परांना कडकडून भेटल्या.