सोलापूर : आर्यन शुगरच्या संचालकांकडून होणार उर्वरित रक्‍कम वसूल | पुढारी

सोलापूर : आर्यन शुगरच्या संचालकांकडून होणार उर्वरित रक्‍कम वसूल

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा आर्यन शुगर साखर कारखान्याची विक्री केल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केवळ 68 कोटी रुपये मिळाले आहेत. परंतु उर्वरित रक्‍कम वसुली करण्यासाठी संचालकांच्या प्रॉपर्टीचा शोध घेऊन त्यांच्याकडून वसूल करण्याच्या हालचाली डीसीसी बँकेने सुरू केल्या आहेत. शुगर आणि आर्यन शुगर साखर कारखान्यामुळे डीसीसी बँक अडचणीत आली. विजय शुगर कारखान्याचा लिलाव बँकेने काढून 125 कोटी रुपये वसूल केले. तरी अद्याप 70 कोटींच्या आसपास रक्‍कम वसूल होणे बाकी आहे.
आर्यन शुगर साखर कारखान्याला बँकेने 360 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

मात्र, कारखान्याची विक्री करूनही तितकी रक्‍कम वसूल झाली नाही. आणखी डीसीसी बँकेला 289 कोटी रुपये आर्यनकडून येणे बाकी आहे. शेतकरी, कामगारांचा हा पैसा वसुल होण्यासाठी बँकेचे न्यायालयात दावे सुरू आहेत. त्यावर वारंवार तारीख आणि त्यासंबधी पुरावे देण्याचे काम संचालकांकडून केले जात आहे. त्यामुळे आर्यन शुगर साखर कारखान्याच्या संचालकांकडून पैसे वसुल करण्यासाठी डीसीसी बँकेने हालचाली सुरू केल्याने संचालकांना घाम फुटला आहे.

डीसीसी बँकेच्या थकबाकीदारांकडून एक रूपयाही सोडणार नाही. पै ना पै बँक बड्या थकबाकीदारांकडून वसुल करणार आहे. हा पैसा सर्वसामान्य शेतकरी आणि कामगारांचा आहे.
– विलास देसाई,
सीईओ, डीसीसी बँक

Back to top button