नाशिक : कवयित्री कराड यांच्या नावाने राज्य पुरस्कार, एमआयटी संस्थेच्या वतीने घोषणा

उर्मिला कराड
उर्मिला कराड
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ज्येष्ठ लेखिका व कवयित्री ऊर्मिला विश्वनाथ कराड यांच्या नावाने पुढील वर्षापासून एमआयटी परिवारातर्फे आदर्श माता पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी घोषणा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी एमआयटीचे राहुल कराड यांच्या वतीने केली.

नाशिकच्या माहेरवाशीण ज्येष्ठ कवयित्री ऊर्मिला विश्वनाथ कराड यांच्या श्रद्धांजली सभेचे मविप्र, क्रांतिवीर व्ही. एन. नाईक या शिक्षण संस्थांच्या पुढाकारातून आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुकर भावे यांनी श्रद्धांजली वाहताना ही घोषणा केली. यावेळी ऊर्मिला कराड यांचे पुत्र व एमआयटीचे राहुल कराड व पंडित वसंतराव गाडगीळ उपस्थित होते.

मधुकर भावे म्हणाले, ऊर्मिला कराड यांनी कविता कधी मिरवल्या नाहीत. त्यांच्या एकेका कवितेवर प्रबंध लिहिता येईल असा आशय आहे. व्याख्यानाचा त्या स्वतंत्र विषय आहे. मात्र, महाराष्ट्रातील साहित्यिकांनी त्यांच्या कवितांची दखल न घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संस्थेचा सातासमुद्रापार झेंडा फडकला, परंतु या झेंड्याची त्या काठी होत्या. या माउलीत मला निखळ मातृत्व दिसले, असेही त्यांनी सांगितले. पंडित वसंतराव गाडगीळ यांनी ऊर्मिला कराड यांच्या कवितांमध्ये संत साहित्याप्रमाणे सात्त्विक भाव असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अ‍ॅड. क. का. घुगे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार अनिल कदम, बाळासाहेब सानप, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, 'मेट'च्या शेफाली भुजबळ, नामको बँकेचे हेमंत धात्रक, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, महाराष्ट्र चेंबरचे संतोष मंडलेचा, माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांच्यासह त्यांच्या परिवारातील प्रकाश केकाण, स्मिता वानखेडे, श्रीराम पाटील, संजय बुरकुल, श्याम केदार, योगेश पाटील यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी पुंजाभाऊ सांगळे, पांडूशेठ केदार, अशोक मुर्तडक , उदय सांगळे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी ध्वनिचित्रफितीद्वारे ऊर्मिला कराड यांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात आला. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.

कौटुंबिक सर्व जबाबदार्‍या लीलया पेलत आईने 'एमआयटी'च्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये अत्यंत चाणाक्षपणे लक्ष घातले. 'एमआयटी'च्या उभारणीमध्ये अनेक वादळे आली, अडचणी आल्या, परंतु या मातेने अशाप्रसंगी सकारात्मक द़ृष्टिकोन कायम ठेवत एक प्रकारची ढाल बनून सर्वांना लढण्याचे बळ दिल्याने अशा प्रसंगांवर मात करणेे शक्य झाले. आई 'एमआयटी'चा पाया आहे. 'एमआयटी'च्या यशस्वी वाटचालीत या मातेचा सिंहाचा वाटा आहे.
– राहुल कराड, कार्यकारी अध्यक्ष,
एमआयटी शिक्षणसंस्था समूह, पुणे

विद्यार्थ्यांना दरवर्षी देणार पुरस्कार
अशोक बोडके यांनी क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेत पुढील तीन वर्षे दहावी-बारावीत प्रथम क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना ऊर्मिला कराड यांच्या नावाने पाच हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news