‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जनजागृती करा | पुढारी

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जनजागृती करा

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा अनौपचारिक शिक्षणातून बालकांची गुणवत्ता वाढवा. “हर घर तिरंगा व सायकल बँक” उपक्रमाची जनजागृती करा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. पंढरपूर पंचायत समितीचे शेतकरी सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्हयातील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाच्या अनुषंगाने आरंभ प्रशिक्षणाचा शुभारंभ आज सीईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, राज्य प्रशिक्षक कांबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, अनुराधा शिंदे, व जिल्हयातील अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.यावेळी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले की, अंगणवाडीचा उद्देश केवळ बालकांचा पूरक आहारातून शारीरिक विकास करणे इतकाच नसून अनौपचारिक शिक्षणातून बौद्धिक विकास करणे हा देखील असलेबाबत उपस्थितांना सांगितले. बालक घरामध्ये असताना देखील त्याचा छोटया छोटया गोष्टीतून विकास कसा करावा याबाबत पालकांना देखील प्रशिक्षीत करणे गरजेचे असलेचे नमूद केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केंद्र शासनाचा उपक्रम हर घर तिरंगा उपक्रम व मुलींची शाळा गळती रोखणेसाठी जिल्हा परिषदेमार्फत सुरु करण्यात आलेला सायकल बँक या उपक्रमाबाबत जनजागृती करून दोन्ही उपक्रम यशस्वीपणे राबविणेबाबत उपस्थितांना आवाहन केले.

बालकांच्या विकासामध्ये पूर्व शालेय शिक्षणाचा सिंहाचा वाटा असून प्रशिक्षणार्थी अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी प्रशिक्षण सत्र मन लावून पूर्ण करावे व जिल्हयातील सर्व अंगणवाडी सेविकांना पूर्व शालेय शिक्षणाबाबत स्वयंभू करून अंगणवाडीच्या पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणेचे आवाहन केले. यावेळी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या घरोघरी तिरंगा, घरोघरी पोषण या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घ्या असे आवाहन सिईओ स्वामी केले.प्रशिक्षण सत्र यशस्वी करणे साठी बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, रेश्मा पठाण, अनुराधा शिंदे, अनुराधा परूरकर, शोभा तडलगी, सुगराबी नदाफ व सौ वालकोळी यांनी प्रयत्न केले.

पूर्व शालेय शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया असलेने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हयातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे पूर्व शालेय शिक्षणाबाबतचे आरंभ प्रशिक्षण सत्र दि. 3 ते 7 ऑगस्ट या कालावधीत दोन बॅच घेणेत येणार आहेत.
-जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी

Back to top button