मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना चाचणीचा आरटीपीसीआर अहवाल असल्याशिवाय महाराष्ट्रात प्रवेश नाही, असा नियम राज्य सरकारने केला असला तरी विविध राज्यांतून कोरोनाचे रुग्ण रेल्वेतून मुंबईत दाखल होत असल्याचे गंभीर चित्र आहे.
गेल्या पाच महिन्यांत विविध राज्यांतून तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत मेल-एक्सप्रेसने दाखल झालेल्या 12 लाख 58हजार 787 प्रवाशांपैकी 791 प्रवासी कोरोना बाधित आढळले. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान 17 एप्रिल ते 31 मे या कालावधीत सर्वाधिक 752 कोरोनाबाधित प्रवासी विविध रेल्वे टर्मिनसवर आढळले, तर जून आणि जुलै महिन्यात प्रत्येकी 16-16 कोरोनाबाधित प्रवासी सापडले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांतही 7 प्रवासी कोरोनाबाधित सापडले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे 17 एप्रिलपासून दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा, केरळ आणि उत्तराखंड या राज्यातून महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांची तपासणी अनिवार्य केली.त्यानंतर 1 मेपासून पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशमधून येणार्या प्रवाशांचीही चाचणी बंधनकारक केली.
तसेच खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या रेल्वे टर्मिनसवर देखील प्रवाशांची तपासणी केली जात आहे.