जनआशीर्वाद यात्रा आजपासून | पुढारी

जनआशीर्वाद यात्रा आजपासून

मुंबई/कणकवली ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे आगमन शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. खारेपाटण येथे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर होणार आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने नारायण राणे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ही यात्रा तळेरे, वैभववाडी, फोंडाघाट मार्गे रात्री कणकवलीत दाखल होणार आहे.

या यात्रेची कणकवलीसह जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागताचे भव्य बॅनर लावले आहेत, कमानी उभारल्या आहेत. 28, 29 दोन दिवस ही यात्रा सिंधुदुर्गात असणार असून, रविवारी सायंकाळी या यात्रेचा समारोप सावंतवाडी येथे होणार आहे.

ना. नारायण राणे यांचे शुक्रवारी सकाळी 9 वा. मुंबईहून रत्नागिरी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी, लांजा, राजापूर अशी यात्रा होणार आहे. सायंकाळी 5 वा. सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे ना. राणे यांचे भव्य स्वरूपात स्वागत केले जाणार आहे. या ठिकाणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीयमंत्री झाल्यानंतर नारायण राणे हे प्रथमच सिंधुदुर्गात येत असल्याने त्यांच्या यात्रेची जिल्हावासीयांना उत्सुकता आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केल्याने नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणाही अलर्ट आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त जिल्ह्यात ठेवण्यात आला आहे. मोठी पोलिस कुमक दाखल झाली आहे. खारेपाटणमार्गे तळेरे, वैभववाडी, फोंडाघाट असा दौरा करत ना.राणे यांचे रात्री कणकवलीत स्वागत होणार आहे.

कणकवलीत त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जानवली पुलापासून नरडवे नाक्यापर्यंत त्यांच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, गुढ्या उभ्यारण्यात आल्या आहेत. भव्य फलकही लावण्यात आले आहेत. या यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. रविवारी सायंकाळी सावंतवाडी येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

गुरुवारी ते लिलावती रुग्णालयात वैद्यकीय चाचण्यांसाठी दाखल झाले होते. त्यामुळे जनआशिर्वाद यात्रा उद्यापासून सुरू होणार की नाही, याबद्दल शंका व्यक्त होत होती. मात्र, काहीही झाले तरी राणे यांची यात्रा उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती भाजपा नेते प्रसाद लाड यांनी दिली. जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरु ठेवण्याचा निर्धार भाजपा आणि नारायण राणे यांनी केला असल्याचे ते म्हणाले. या यात्रेच्या निमित्ताने भाजपाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राणे यांच्या अटकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणे यांना फोन करून सर्व प्रकरणाची माहिती घेतल्याने भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आता यात लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेतही अस्वस्थतेचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांना भुवनेश्‍वर दौरा सोडून मुंबईत परत येण्याचे आदेश पक्षनेतृत्वाने दिल्याची माहिती आहे. त्यानुसार राऊत आज संध्याकाळीच मुंबईत पोहोचले आहेत.

आता लक्ष्य अनिल परब!

परिवहन मंत्री अनिल परब यांनी राणे यांच्या अटकप्रकरणात पोलिसांना आदेश देऊन हस्तक्षेप केल्याचे संभाषण पुढे आल्याने परब हे आता राणे यांचे पुढचे लक्ष्य असतील, अशी शक्यता आहे. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. भाजपच्या या पवित्र्याने परब अडचणीत येण्याची शक्यता असून, त्यांची आणखी काही प्रकरणे बाहेर काढू, असा इशाराच भाजपकडून देण्यात आला आहे.

Back to top button