नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय | पुढारी

नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
सध्या होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ला व मांगीतुंगी पर्वतावर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे.ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. सहाणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बागलाण तालुक्यात गेल्या आठ – दहा दिवसापासून प्रचंड अतिवृष्टी सुरू आहे. विशेषत्वाने पश्चिम पट्ट्यातील दुर्गम डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. याच परिसरात असलेल्या साल्हेर किल्ला व मांगीतुंगी पर्वत परिसरात मोठ्या प्रमाणात राज्यभरातील पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी येतात. परंतु, गेल्या आठवड्यात साल्हेर येथे किल्ल्यावर अवघड चढाई करताना पाय घसरून पडल्याने मालेगावच्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी या परिसरात पर्यटनबंदी करावी, यासाठी वनविभागाला साकडे घातले होते. त्यानुसार वनविभागाचे उपविभागीय अधिकारी जे. एन. येडलवार यांच्या मार्गदर्शनानुसार साल्हेर किल्ला व मांगीतुंगी पर्वतरावर पर्यटनासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत आगामी एक महिनाभरासाठी ही बंदी असून, पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत या दोन्ही ठिकाणी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसोबतच जायखेडा पोलिस कर्मचारी गस्तीवर आहेत. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना समजावून सांगून परत पाठविले जात आहे. कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी महिनाभर तरी या परिसरात कुणीही पर्यटनासाठी येऊ नये, असे आवाहन ताहाराबादचे वनपरिक्षेत्र अधिकारी सहाणे व सहायक पोलिस निरीक्षक पारधी यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button