नाशिक : छगन भुजबळांकडून गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी | पुढारी

नाशिक : छगन भुजबळांकडून गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत दर तासाला आढावा घेऊन नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्याटप्प्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वय ठेवून पूरपरीस्थीती हाताळावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने शहर व जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीसह जिल्ह्यातील नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी आज नाशिक गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन. डी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, नाशिक मनपाचे माजी गटनेते गजानन शेलार, कॉंग्रेसच्या नगरसेविका वत्सला खैरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहर सरचिटणीस संजय खैरनार, नाना पवार, रवी हिरवे, अॅड.चिन्मय गाढे, रामेश्वर साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्या भेटी दरम्यान छगन भुजबळ यांनी पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. गोदावरी नदीत निर्माण झालेल्या पानवेलींमुळे निफाड तालुक्यातील बंधाऱ्याना धोका निर्माण होत असून त्या तातडीने हटविण्यात याव्यात. नाशिक शहरातील धोकादायक वाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासोबतच पडलेल्या वाड्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात यावा. तसेच लासलगाव-विंचूरसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणाचे एक गेट बंद करण्यात यावे अशा सूचना केल्या.

जीवितहानी टाळण्यासाठी पूरपरीस्थिती पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या तसेच धोकेदायक पुलांवरून जाणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा याबाबत चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा :

Back to top button