नारळ: सणासुदीत श्रीफळ कडाडणार! | पुढारी

नारळ: सणासुदीत श्रीफळ कडाडणार!

नवी मुंबई; पढारी वृत्तसेवा: नारळ उत्पादक प्रदेशांमध्ये धुवाधार पाऊस सुरू असल्याने नारळ तोडण्याचे काम ठप्प झाले आणि एपीएमसीमधील आवक घटली. परिणामी, ऐन सणासुदीत आणि विशेषत: श्रावणाच्या तोंडावर श्रीफळ 10 ते 15 टक्क्यांनी कडाडणार, अशी भीती मुंबई श्रीफळ मर्चंट असोसिएशनचे सरचिटणीस केनिया पारस यांनी पुढारीशी बोलताना व्यक्‍त केली.

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तब्बल 90% नारळ तामिळनाडूतून येतो. याशिवाय कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून देखील श्रीफळाचा पुरवठा होत असतो. तामिळनाडू,आंध्र प्रदेश व कर्नाटकात पाऊस अविरत सुरू असल्याने नारळ तोडणी ठप्प आहे. सध्या सुरू असलेला आषाढ जेमतेम पंधरा दिवसांचा सोबती आहे. त्यानंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्यात धार्मिक कार्ये आणि सणांची एकच गर्दी होते व नारळाला मोठी मागणी असते. मिठाया तसेच रेस्टॉरंट, घरगुती वापरातही नारळाचे प्रमाण वाढते. यंदा मात्र पावसामुळे नारळाची आवक मंदावली आहे.

वर्षभर घाऊक बाजारात नारळाच्या 15 ते 30 गाड्या रोज बाजारात येतात. गणेशोत्सवादरम्यान नारळाची आवक 45 ते 60 गाड्या नारळ दररोज बाजारात दाखल होत असतात. सध्या मात्र एपीएमसी बाजारात प्रतिदिन फक्‍त 10 ट्रक नारळ येत आहे. आता 1 ऑगस्टपासून पहिला श्रावणी सोमवार, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, बैल पोळा, हरितालिका, गणेश चतुर्थी, ऋषिपंचमी, अनंत चतुर्दशी (गणेशोत्सव) , घटस्थापना (नवरात्र उत्सव) दीपावली आदी एकापाठोपाठ धार्मिक सण येतील आणि नारळाला मागणी वाढेल. त्या तुलनेत पुरवठा मात्र होणार नाही.कोरोनाच्या काळात नारळाच्या एका टनाला 45 हजार रुपये मोजावे लागत होते. कोरोना ओसरताच हे दर 40 टक्क्यांनी कोसळले आणि टनाचे भाव 27 हजारांवर आले.

Back to top button