हजार पाईलिंगचे काम पूर्ण; हिंजवडी मेट्रोचे काम वेगात | पुढारी

हजार पाईलिंगचे काम पूर्ण; हिंजवडी मेट्रोचे काम वेगात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेवरील पुणे मेट्रो लाईन 3 चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत मेट्रो प्रशासनाकडून या मार्गिकेवरील 1 हजार पाईलिंगचे काम पूर्ण झाले आहे. या पाईलिंगवर कॅप्स बांधणीचे कामसुद्धा वेगाने सुरू असून, आतापर्यंत 27 खांबही उभारले गेले आहेत. बालेवाडी स्टेडियमजवळ पुणे मेट्रो लाईन 3 च्या नियोजित स्टेशन क्रमांक 10 येथे हे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.

‘पाईलिंग’ म्हणजे काय?
पाईलिंग काम ही बांधकाम प्रक्रिया पाया स्थापित करण्यासाठी वापरली जाते. स्टेशन ज्या पिलरवर (खांब) उभे केले जाणार आहे, त्या पिलर आणि त्याच्यासाठी खणलेल्या पाईलिंगला जोडणारा पाया म्हणजे पाईल कॅप असते. ही पाईलकॅप टाकण्यापूर्वी जमिनीमध्ये खांबावर एकूण किती प्रेशर असणार आहे, त्यानुसार एकसारख्या आकाराचे खड्डे केले जातात, ज्यांना ‘पाईल’ म्हटले जाते. अशा सहा पाईलिंगवर एक स्टेशन पाईल कॅप उभी राहते. साधारण 14 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. या कामासाठी लागणार्‍या एकूण वेळामध्ये, प्रत्यक्ष बांधकामासाठीचे 14 दिवस आणि त्यानंतर 21 दिवसांचा प्रतीक्षाकाळ असतो. साधारण एक महिन्यामध्ये या पाईलकॅपवर पिलर (खांब) उभा केला जाऊ शकतो. दरम्यान, लोड टेस्ट, क्वालिटी चेक यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांची पूर्तता केली जाते.

Back to top button