पुण्यात दिवसाआड पाणीकपातीचे नियोजन; आता प्रतीक्षा कपातीच्या निर्णयाची | पुढारी

पुण्यात दिवसाआड पाणीकपातीचे नियोजन; आता प्रतीक्षा कपातीच्या निर्णयाची

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणीसाठा लांबलेल्या पावसामुळे कमी होत चालला असल्याने आता पाणीकपातीचे संकट आणखी गडद झाले आहे. महापालिका प्रशासनाने दिवसाआड पाणीकपातीचे नियोजन केले असून, आता केवळ निर्णयाची औपचारिकता उरली आहे. जूनचा महिना आता जवळपास संपत असताना अद्यापही पावसाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चारही धरणांमध्ये केवळ 2.5 टीएमसीइतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेला आठवडाभरापुर्वीच पत्र पाठवून शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कपातीचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी आयुक्त विक्रम कुमार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक बोलविली होती. मात्र, ही बैठक होऊ न शकल्याने यासंबंधीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. दुसरीकडे मात्र पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठयाचे दिवसाआड पाणीकपातीचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहराचे पूर्व आणि पश्चिम भाग अशा पध्दतीचे नियोजन केले आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने उपनगरांमध्ये काही भागांत रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत पाणीपुरवठयाचे नियोजन केले आहे. तर, काही भागांत सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत पाणीपुरवठ्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे. दरम्यान, हे नियोजन अद्याप अंतिम करण्यात आलेले नाही. पाणीकपातीचा निर्णय झाल्यानंतर यासंबंधीचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाकडून अंतिम नियोजन होणार आहे. तसेच, यासंबंधीची बैठक आज-उद्याच होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

Back to top button