नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे निर्माण झालेली राजकीय अस्थिरता पाहता त्याचा महापालिकांच्या आगामी निवडणुकांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेत कोणता आणि कसा बदल होतोय यावरच नाशिक महापालिकेच्या लोकप्रतिनिधींचाही मूड असणार आहे. त्या द़ृष्टीनेच एका पक्षातून दुसर्या पक्षात उड्या मारणारे वेट अॅण्ड वॉच करूनच पुढील राजकीय भविष्याचा निर्णय घेतील.
महापालिकेच्यान निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. यामुळे मार्चमध्ये होणार्या निवडणुकीसाठी तयारी करणारे इच्छुक उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींनी प्रचारातून जरा उसंत घेतली होती. या काळात त्यांच्याकडून आपली राजकीय मोर्चेबांधणीची तयारी सुरू केली होती. महापालिका निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी असलेले तिन्ही घटक पक्षांची आघाडी होणार की केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार यावरून खल सुरू आहे. आघाडी झाल्यास उमेदवारी न मिळणार्यांना मनसे आणि भाजप असा पर्याय होता, तर राज्यातील सत्ता पाहून त्या द़ृष्टीने भाजपमधीलही अनेक नाराज व उमेदवारी न मिळण्याची शक्यता असलेल्यांकडून राष्ट्रवादी तसेच शिवसेना हा पर्याय होता. त्याचबरोबर सुरक्षित प्रभाग वा वर्चस्व नसलेल्या प्रभागांमध्ये शिवसेनेकडून भाजपमधील कोणी उमेदवार हाती लागतोय का याचीदेखील चाचपणी सुरू होती. त्याद़ृष्टीने प्रभाग क्रमांक 4, 16, 17, 27 या प्रभागांमध्ये उमेदवारांसाठी शिवसेनेकडून शोध सुरू आहे, तर भाजपकडूनदेखील सिडको, नाशिकरोड या भागांत शिवसेनेतील कोणी ताकदवान उमेदवार मिळतोय का याची चाचपणी सुरू होती. मात्र, ना. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महापालिका निवडणुकीसाठी एका जहाजातून दुसर्या जहाजात उड्या मारून आपले राजकीय बस्तान बसविणार्यांनीही आता वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
राजकीय घडामोडींवर अनेकांचे लक्ष
नाशिक महापालिकेत ना. शिंदे यांचे अनेक नगरसेवक तसेच पदाधिकारी हे समर्थक आहेत. गेल्या अडीच वर्षांत याला पुष्टी देणार्या अनेक बाबी दिसून आल्या. महापालिकेतील अनेक प्रश्न आणि अडचणी सोडविण्याच्या द़ृष्टीने तसेच निधी मिळविण्यासाठी काही नगरसेवक आणि पदाधिकार्यांचे नेहमीच ना. एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीगाठी होत राहिल्या. त्यावरून आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात त्यावर नाशिकमधील त्यांचे अनेक समर्थक लक्ष ठेवून आहेत.