नगर : 57 फेटाळल्या; 8 हरकतींचीच घेतली दखल | पुढारी

नगर : 57 फेटाळल्या; 8 हरकतींचीच घेतली दखल

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा परिषद गट व गणांच्या प्रारुप रचनेवर दाखल झालेल्या 65 हरकती पैकी 57 हरकती फेटाळण्यात आल्या असून फक्त 8 हरकती मंजूर करण्यात आल्या आहेत. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या 85 गट व चौदा पंचायत समित्यांच्या 170 गणांच्या अंतिम रचनेस मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले 27 जून रोजी अंतिम रचना प्रसिध्द करणार आहेत. त्यामुळे कोणते गाव कोणत्या गटात आणि गणात आहे, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

नाशिक शहरातील सहा अल्पवयीन मुलींचे अपहरण

अहमदनगर जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समित्यांच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाल 20 मार्च 2022 रोजी संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घ्या, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेचे 85 गट व पंचायत समित्यांच्या 170 गणांचा प्रारुप रचना तयार केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 2 जून रोजी प्रारुप गट व गणांच्या रचनेची अधिसूचना प्रसिध्द केली. या रचनेवर 8 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या.

रत्नागिरी : मिरजोळे येथे गावठी दारुधंद्यावर छापा; तिघांवर गुन्हा दाखल

या प्रारुप रचनेवर जिल्हाभरातून एकूण 65 हरकती दाखल झाल्या होत्या. या दाखल हरकतींवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुनावणी घेतली. या हरकतींवर 22 जूनपर्यंत निर्णय घेऊन अंतिम गट व गणांच्या रचनेस अंतिम मंजुरी देण्याचे निदेंश आयोगाने दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त गमे यांनी सुनावणीत 65 पैकी 57 हरकती फेटाळून लावल्या आहेत. केवळ 8 हरकतींवरील आक्षेप मान्य केले. त्यानुसार प्रारुप रचनेत दुरुस्ती करुन त्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या अंतिम रचनेस मान्यता दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारी (दि.27) जिल्हा परिषदेचे 85 गट व पंचायत समित्यांचे 170 गणांची नावे आणि त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांची अंतिम रचना प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे कोणते गाव कोणत्या गटात आणि गणांत समाविष्ट करण्यात आले याची उत्सुकता ग्रामीण जनतेबरोबरच राजकीय कार्यकर्त्यांना लागली आहे.

देहरे गटाला आता वडगाव गुप्ता नाव
गट व गणांच्या प्रारुप रचनेत नगर तालुक्यातील देहरे व नवनागापूर या दोन गटांबाबत देखील हरकती दाखल झाल्या. या हरकतीची दखल घेऊन नवनागापूर गटातील वडगाव गुप्ता हे गाव देहरे गटात टाकण्यात आले आहे. मात्र, वडगाव गुप्ता या गावाची लोकसंख्या अधिक असल्यामुळे देहरे गट आता वडगाव गुप्ता नावाने ओळखला जाणार आहे. नगर पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांची हरकत 25 टक्के मान्य झाली. ही हरकत शंभर टक्के मान्य करण्यात यावी, यासाठी ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

नगरच्या सात हरकती मान्य
नगर तालुक्यातून सर्वाधिक 12 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी निंबळक येथील समीर पटेल, भोरवाडी येथील रामदास भोर, शिराढोण येथील प्रितेश दरेकर, गुणवडी येथील कुटे, निबंळक येथील कानिफनाथ कोतकर, चास येथील राधाकृष्ण वाळूंज व निंबळक येथील डॉ. दिलीप पवार यांच्या सात हरकतीची विभागीय आयुक्त गमे यांनी दखल घेतली. त्यानुसार नगर तालुक्यातील गट व गणात फेरफार करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव बु. येथील नितीन भानुदास औताडे यांनी देखील पोहेगाव गटाबाबत आक्षेप नोंदविला होता. त्यांच्या हरकतीची देखील दखल घेतली गेली आहे. विभागीय आयुक्त गमे यांनी एकूण आठ हरकतींची दखल घेत अंतिम गट व गणांच्या रचनेस बुधवारी मान्यता दिली आहे.

Back to top button