

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी पोलिसांनी आंतरजिल्हा गुन्हेगारास पकडून त्याच्याकडून पाच पिस्तूल व 10 जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपी उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणून सोलापुरात विकत होते
प्रवीण राजा शिंदे (वय 30, रा. वडूज, ता. कराड, जि. सातारा), स्वरूप विजय पाटील (रा. तांबवे, ता. कराड, जि. सातारा), अमोल ऊर्फ पप्पू विलास खरात (रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा), ओंकार ऊर्फ रावडी जालिंदर देशमुख (रा. सातारा) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन माने यांना खबर्याकडून माहिती मिळाली की, सातार्याचा एक जण तुमच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन येत आहे. ही बातमी मिळाल्यावर पो. नि. माने यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना ही माहिती दिली. डी.बी. पथकाचे प्रमुख साहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी व त्यांच्या पथकाने एसव्हीसीएस शाळेसमोर सापळा लावला. त्यावेळी एमएच11/सीआर 5209 या क्रमांकाच्या मोटारसायकलवर संशयीतरित्या येताना दिसला. त्यावेळी पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. व त्याची अंगझडती घेतली. तेंव्हा त्याच्याकडे एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्या विरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी आरोपी प्रवीण शिंदे याला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीमध्ये चौकशी केली असता, ती पिस्तुले व काडतुसे कोणाकडून आणली, कोणास देणार होता आदी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी स्वरूप पाटील याला अटक केली, पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
अमोल खरात याला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे जप्त केली. ओंकार देशमुख याला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. अशा प्रकारे पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच पिस्तुल व 10 जिवंत काडतुसे जप्त केली. अशा प्रकारे दहा काडतुसांसह तीन लाख 55 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कामगिरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी, हवालदार राकेश पाटील, पोलिस नाईक चेतन रूपनर, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, अय्याज बागलकोटे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल यादव, अश्रुभान दुधाळ, किशोर व्हनगुंटी, सचिन जाधव, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, शंकर याळगी, इकरार जमादार यांनी पार पाडली.