नाशिक : स्वयंपूर्ण गाव व संपन्न भारतासाठी गुरुमाऊलींचे अमूल्य योगदान : अमित शाह

नाशिक : स्वयंपूर्ण गाव व संपन्न भारतासाठी गुरुमाऊलींचे अमूल्य योगदान : अमित शाह

Published on
नाशिक : पुढारी वृत्तसेवा 
'ग्राम विकासातूनच देश संपन्न घडू शकतो असे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे आज प्रयत्नशील आहेत' असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात संपन्न झालेल्या सद्गुरू प. पू. मोरदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या शिलापूजन सोहळ्यात भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहून हजारो सेवेकर्‍यांशी मार्गदर्शनपर संवाद साधला, याप्रसंगी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी व्यासपीठावर गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आ. सिमा हिरे, आ. हिरामण खोसकर, उद्योगपती शिवांशू पांडे, राजेश शाह, विनोद जैन, शिरीष शाह, रजनीश कुमार, चंद्रकांदा दादा, नितीन मोरे, आबासाहेब मोरे, डॉ. दिकपाल गिरासे, प्रमोद रहाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आजच्या सोहळ्यात मी गुरुपीठात उपस्थित राहणार होतो. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव मला दिल्लीत राहवे लागत असल्याने मी आपल्या सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत आहे. पण मी स्वत: गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच येणार असल्याचे सांगून सेवामार्गाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.  शाह म्हणाले, 'नाशिक, त्र्यंबक नगरीचे आगळे वेगळे महत्व आहे. रामायण कालीन घटनांची साक्षीदार ही भूमी आहे. अशा पावन भूमीत गोर-गरिबांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी सर्व आत्याधुनिक सुविधा असलेले हॉस्पिटल गुरुमाऊली उभे करत आहेत याचा भविष्यात हजारो रुग्णांना लाभ होणार आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून  सामान्य माणूस एकत्र येऊन किती मोठे काम करु शकतो हे पण गुरुमाऊलींनी दाखवून दिलेले आहे. करोडो रुपयांचे हे हॉस्पिटल सेवेकर्‍यांच्या एक-एक रुपयातून उभे राहत आहे. याचा मला आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
सेवामार्गाच्या जगभर होत असलेल्या विस्ताराबाबत बोलतांना, अमित शाह यांनी विस्तृतपणे चर्चा केली. आज सेवामार्ग महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, तमिळनाडू, केरळ असे विविध राज्य आणि भारताबाहेर नेपाल, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई अशा अनेक देशांमध्ये जाऊन पोहोचला आहे. समाजाला देण्याची परंपरा सेवामार्ग 70 वर्षांपासून जोपासत आहे. 7000 सेवा केंद्रांच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा, ग्राम व नागरी विकास अभियान, बालसंस्कार, शेतकरी मेळावे, कृषी गट, जैविक शेती, दुष्काळात शेतकर्‍यांना मदत अशा अनेक कामातून सामान्य जनतेपर्यंत सेवामार्ग पोहोचतो आहे. असे सांगून हे सर्व स्तुत्य उपक्रम अनुभवण्यासाठी मी लवकरच गुरुपीठात येणार असल्याचा पुनरुच्चार अमित शाह यांनी केला.
गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनीही उपस्थित महिला-पुरुष सेवेकर्‍यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अमित शाह हे महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे खरे वारसदार आहे. देशात शांतता, सुबत्ता नांदण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांना या कार्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा कायम आशीर्वाद आहे.
सकाळी अकरा वाजता गृहमंत अमित शाह यांचे ऑनलाईन आगमन झाले. त्यानंतर दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण झाले. तद्नंतर शिलापूजनाचा सोहळा संपन्न झाला. सेवामार्गाच्या वतीने डॉ. दिकपाल गिरासे यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर अमित शाह यांनी मार्गदर्शनपर संवाद साधला. सूत्रसंचालन सिमा पेटकर यांनी केले. आज जागतिक योग दिवस असल्याने सकाळी गुरुपीठ आवारात बालसंस्कार विभागाच्या वतीने लहान मुलांनी विविध योगासने करुन हा दिवस साजरा केला. आजच्या सोहळ्यात देशभरातून सेवेकरी आले होतेच परंतु परदेशातून अमेरिका, दुबई, नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया या देशातूनही सेवेकरी आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान…. 
कोरोना काळातील सेवामार्गाच्या कार्याचा उल्लेख करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या काळात जनतेसाठी खूप मोठे काम केले आहे. स्वास्थ्य सेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रयत्नशील आहेत. आत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाबरोबरच आयुष, आयुर्वेद, योग यात संशोधन कार्य हाती घेऊन सर्वांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मोदीजींमुळे योग आज जगभर पोहचला आणि संपूर्ण जगभर आज योग दिन साजरा होत असल्याचे शहा म्हणाले.

हेही वाचा  :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news