

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्या पवना, इंद्रायणी व मुळा या तिन्ही नदीतील जलपर्णी काढण्यासाठी दोन महिने कालावधीसाठी 43 लाख 25 हजार 290 खर्च करण्यात आला. इतका खर्च करूनही अद्याप नदीपात्रात जलपर्णी दिसत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी नदी पात्रातील जलपर्णी काढली जाते. मात्र, मोठ्या प्रमाणात फोफावणार्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या रहिवाशांना डास व दुर्गंधीचा त्रास नित्याचा झाला आहे. त्यावरून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. लोकप्रतिनिधींही नाराजी व्यक्त केली आहे. जलपर्णी काढण्यासाठी सन 2022-23 साठी पालिकेकडून निविदा काढली गेली. त्यासाठी नदीचे सहा पॅकेजनुसार तिन्ही नद्यांची विभागणी केली होती. लघुत्तम दर देणार्या ठेकेदारांकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्यांचे काम रद्द करून, दुसर्या क्रमांकावरील ठेकेदाराकडून काम करून घेण्यात आले.
दिलीप नाणेकर, वैष्णवी एटरप्रायजेस व तावरे कन्ट्रक्शन कंपनी या तीन ठेकेदारांनी सहा पॅकेजनुसार दोन महिने जलपर्णी काढण्याचे काम केले. त्यासाठी एकूण 43 लाख 25 हजारांचा खर्च महापालिकेने केला. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र, इतका खर्च करूनही नदी पात्रात काही ठिकाणी जलपर्णी पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे.