Arrest : आराम बसमध्ये 18 लाखांच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या टोळक्याला बेड्या

Arrest : आराम बसमध्ये 18 लाखांच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या टोळक्याला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मुंबई येथून मंगलोर येथे जाणाऱ्या खासगी आराम बस मध्ये सुमारे 18 लाखांच्या दागिन्यांची लूट करून मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई करीत असताना दोन पोलीस जखमी झाले.  महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या पोलिसांना गुंगारा देत हे टोळके मध्य प्रदेशात जात असताना त्यांना पकडण्यात आले.

मुंबई येथून कर्नाटक राज्यात जाणारी ही खासगी आरामबस एका धाब्यावर थांबली असताना एमपी 09 डब्ल्यू एल 92 84 क्रमांकाच्या ब्रिजा कार मधून आलेल्या चौघा तरुणांनी आराम बस मधील प्रवाशांकडून सुमारे 18 लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतले. याप्रकरणात बाइंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान या गुन्ह्याचा तपास करीत असताना बाइंदूर पोलीस ठाण्याचे पथक तपास करीत असताना त्यांना कारचा नंबर आढळून आला. त्यामुळे त्यांनी या कारचा कर्नाटक राज्यातून पाठलाग सुरू केला. ही कार घटनास्थळाहून बेंगलोर मार्गे तेलंगणा मधून महाराष्ट्रातील औरंगाबाद, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून मध्यप्रदेशकडे निघाली होती. दरम्यान या कारचा सातत्याने कर्नाटक पोलीस पाठलाग करत होते.

त्यासाठी वाटेत येणारे टोलनाक्यांवरील तसेच हॉटेल वरील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेऊन हे पथक या कारच्या मागावर होते. या प्रवासादरम्यान चोरट्यांच्या कारचा क्रमांक तीन ठिकाणी बदलावला. त्यामुळे महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमधून जात असताना पोलीस पथकाला ही कार अडवण्यात मोठ्या अडचणी आल्या. अखेर ही माहिती धुळे जिल्हा पोलिसांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षक हेमंत पाटील, सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत यांचे स्वतंत्र चार पथक तयार करण्यात आले. या पथकातील कर्मचारी योगेश चव्हाण, गौतम सपकाळ, राहुल सानप, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, शामराव अहिरे, विजय पाटील, सुरज कुमार साळवे यांनी औरंगाबाद कडून येणाऱ्या मार्गावर सापळा लावला. ही कार सोनगिर शिवारात आल्यानंतर पोलीस पथकाने शिताफीने टोल नाक्यावरील रस्त्यावर सापळा लावला. ठरल्याप्रमाणे कार टोलनाक्याच्या केबिन जवळ थांबली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडी समोर उडी मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी ती गाडी वेगाने मागे घेतली. या बाजूने सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने गाडी अडवली. मात्र चोरट्यांनी या गाडीला गुंगारा देऊन पळण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे पोलिस पथकाने थेट कारची काच फोडूनच चोरट्यांना ताब्यात घेतले.या झटापटीत विजय कुमार व कॉन्स्टेबल श्रीधर हे जखमी झाले.

या चोरट्यांची चौकशी केली असता त्यांची नावे अमजद खान हुसेन खान, अली खान हुसैन खान ,एकरार मुक्तार खान आणि गोपाल पप्पू अंमलदार असे असल्याचे निदर्शनास आले. या चोरट्यांच्या ताब्यातून अठरा लाख रुपयांचे दागिने देखील जप्त करण्यात आले. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील पोलिसांना गुंगारा देऊन मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या टोळक्याला धुळे पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने अटक केल्याने धुळ्याची पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पोलिस पथकाचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news